“दैनिक प्रभात’च्या वृत्ताची दखल : जबाबदारी टाळणाऱ्या अधिकाऱ्यांची चौकशी
पिंपरी – पालिकेच्या ठेकेदाराने केबल टाकण्यासाठी खोदलेल्या रस्त्यावर दुचाकी घसरून झालेल्या अपघातामध्ये महिलेचा मृत्यू झाला. ही घटना आकुर्डी रेल्वे स्टेशनजवळ घडली. याबाबत अधिकाऱ्यांशी संपर्क केला असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. याबाबत “दैनिक प्रभात’मध्ये सविस्तर वृत्त प्रकाशित करण्यात आले होती. त्याचे पडसाद महापालिकेच्या सर्वसाधारण सभेमध्ये पडले. नगरसेवक दत्ता साने यांनी ही बातमी वाचून दाखवत प्रशासनावर ताशेरे ओढले.
सरस्वती शिंदे या महिलेचा अपघात होऊन त्या मृत्युमुखी पडल्या. स्मार्ट सिटी अंतर्गत सीसीटीव्हीसाठी केबल टाकण्यासाठी शहरात सध्या खोदाई सुरू आहे. त्या खोदाई केलेल्या रस्त्यावरून जात असताना त्यांचा अपघात झाला. याबाबत प्रशासनाला विचारले असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. स्मार्ट सिटीचे अशोक भालकर यांनी आमच्या विभागाचे काम नसल्याचे सांगितले. तर बीआरटीएसचे विजय भोजणे यांनीही या खड्ड्याबाबत हात झटकले.
या वृत्ताची दखल घेत नगरसेवक साने यांनी बातमी वाचून दाखवली. ते म्हणाले, अधिकाऱ्यांनी दिलेली उत्तरे म्हणजे जबाबदारी झटकण्याचे उत्तम उदाहरण आहे. ठेकेदारांना अधिकारी पाठीशी घालतात. ठेकेदार महापालिकेचे जावाई आहेत का? आयुक्तसाहेब तुम्ही काय कारवाई करणार ते सांगा. अन्यथा तुमच्यावर मी मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करू शकतो. नगरसेवक तथा माजी महापौर राहुल जाधव म्हणाले, खड्ड्यांमुळे जे बळी जातात त्याला कारणीभूत कोण याचा खुलासा करावा.
आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी यावर खुलासा देत दोषींवर कडक कारवाई करण्याचे आश्वासन दिले. ते म्हणाले, मृत्यू झालेल्या महिलेची प्रशासनाच्या वतीने दखल घेण्यात आली आहे. यासंदर्भात चौकशी करून अतिरिक्त आयुक्त संतोष पाटील व श्रीकांत सवणे यांनी या प्रकरणाची चौकशी करावी. तीन दिवसांत माझ्याकडे याबाबतचा अहवाल द्यावा. अहवालानुसार, जे अधिकारी दोषी असतील त्यांच्यावर कारावाई केली जाईल.