शहरातील डेंग्यूची रुग्ण संख्या घटली
पुणे – शहरातील डेंग्यूची साथ आटोक्यात आणण्यासाठी धडपडणाऱ्या महापालिकेला अखेर शहरातील वाढत्या थंडीने दिलासा मिळाला आहे. जानेवारीमध्ये वाढलेल्या थंडीमुळे गेल्या 20 दिवसांत शहरात डेंग्यूची लागण झालेले अवघे 3 रुग्ण आढळून आले आहेत. शहरात पावसाळा सुरू होताच, या वर्षी मोठ्या प्रमाणात डेंग्यूची साथ वाढली होती. त्यातच, पावसाळा जवळपास 5 महिने असल्याने डिसेंबर 2019 अखेरपर्यंत मोठ्या प्रमाणात डेंग्यूचे रूग्ण आढळून येत होते.
आरोग्य विभागाककडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, मागील वर्षात म्हणजेच जानेवारी ते डिसेंबर 2019 या कालावधीत शहरात डेंग्यूचे सुमारे 6 हजार 40 संशयित रुग्ण आढळून आले होते तर, त्यातील 1,407 जणांना डेंग्यूची लागण झाली होती.
तर जुलै 2019 पासून शहरात डेंग्यूच्या रुग्णांची संख्या लक्षणीयरित्या वाढण्यास सुरुवात झाली होती. त्यात जुलैमध्ये 73, ऑगस्ट 157, सप्टेंबर 321, ऑक्टोबर 465, नोव्हेंबर 221 तर, डिसेंबर 2019 मध्ये थंडी पडण्यास सुरुवात झाल्यानंतर डेंग्यूची लागण झालेल्या रुग्णांचा आकडा 93 वर आला होता. मात्र, जानेवारी 2020 मध्ये शहराचा थंडीचा पारा आणखी घसल्याने डेंग्युची साथ गेल्या 20 दिवसांत नियंत्रणात आली असून या आजाराची लागण झालेले केवळ 3 रुग्ण आढळून आल्याची माहिती महापालिकेचे सहायक आरोग्य प्रमुख डॉ. संजय वावरे यांनी दिली.
साडेतीन हजार जणांना नोटीस
शहरात डेंग्यूची साथ आटोक्यात आणण्यासाठी महापालिका प्रशासनाकडून डासोत्पत्ती स्थाने शोधण्याची विशेष मोहीम हाती घेतली होती. त्यात शहरात सुमारे 5 लाखांहून अधिक ठिकाणांची तपासणी करण्यात आली. या तपासणीत सुमारे 3,416 ठिकाणी डासांची पैदास आढळून आली. त्यामुळे ही डासोत्पत्ती ठिकाणे नष्ट करून महापालिकेने याला जबाबदार धरत संबंधितांकडून तब्बल 4 लाख 36 हजार 351 रुपयांचा दंड वसूल केला असल्याचेही डॉ. वावरे यांनी स्पष्ट केले.