पिंपरी – शहर फ्लेक्समुक्त करण्यासाठी महापालिकेने पुन्हा तेच प्रयत्न केले आहेत. संपूर्ण शहर अनधिकृत फलक, बॅनर्स, कमानीने विद्रूप झालेले असताना पालिकेकडून ते काढण्यासाठी त्याच व्यक्तीची पुन्हा नियुक्ती केली आहे. शहरातील सर्व अनधिकृत फलक काढण्याची जबाबदारी सरदार रविंद्रसिंह यांनी घेतली होती. आता पुन्हा हे काम सरदार रविंद्रसिंह यांना देण्यात आले आहे. सहा महिन्यांसाठी त्यांची फेरनियुक्ती करण्याचा निर्णय महापालिका स्थायी समितीच्या बैठकीत घेण्यात आला. महापालिकेकडून कोणताही खर्च न घेता त्यांनी शहर फ्लेक्समुक्त करण्याची पुन्हा तयारी दाखविली आहे.
उच्च न्यायालयाकडून विना परवाना जाहिरातींवर कारवाईचे स्पष्ट निर्देश आहेत. परंतु, राजकीय दबावापोटी महापालिका प्रशासन अनधिकृत जाहिरातदारांवर कठोर कारवाई करण्यास धजावत नाही. परिणामी, शहराचे विद्रुपीकरण होते. त्याबाबत वारंवार पाठपुरावा करणाऱ्या सरदार रविंद्रसिंह यांनी शहर विद्रुपीकरण मुक्त करण्यासाठी महापालिकेला प्रस्ताव दिला होता. त्यानुसार कोणताही खर्च न घेता या जाहिराती ते काढणार आहेत. त्यास स्थायी समिती व आयुक्तांनी मान्यता दिल्यानंतर कामाचे आदेशही देण्यात आले. परंतु, या कारवाईसाठी महापालिकेने सहकार्य न केल्याने त्यांनी हे काम बंद केले होते.
निवडणुकीच्या काळात जाहिराती काढण्यासाठी पुन्हा त्यांना नेमण्यात आले होते. आता महापालिकेने पुन्हा सरदार रविंद्रसिंह यांची सहा महिन्यासाठी फेरनियुक्ती करण्याचा निर्णय घेतला आहे. अनधिकृत बांधकाम व नियंत्रण विभागाच्या या प्रस्तावाला स्थायी समितीने आयत्यावेळी मान्यता दिली. त्यानुसा काम सरदार रविंद्रसिंह याना देण्यात आले आहे. कारवाईतील साहित्य त्यांना दिले जाणार आहे.