आमदार मोहिते पाटलांच्या कार्यक्रमातील फ्लेक्स घेत होता लक्ष वेधून
राजगुरूनगर – विरोधात गेलेल्या मंत्री, आमदारांनी आपला फोटो वापरू नये, असे ज्येष्ठ नेते, खासदार शरद पवार यांनी सांगितले आहे. असे असताना खेड तालुक्यातील राजगुरूनगरमध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्या माध्यमातून झालेल्या कार्यक्रमाच्या फ्लेक्सवर शरद पवार यांच्यासह शरद पवार समर्थक खासदार डॉ. अमोल कोल्हे यांचे छायाचित्र छापण्यात आले होते. विशेष म्हणजे या फ्लेक्सवर भाजपचे पंतप्रधान नरेंद्र मोदींना स्थान देण्यात आले नसल्याचे समोर आले आहे.
भाजप-शिंदे गटाच्या स्थानिक कार्यकर्त्यांना टाळून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचे फोटो दर्शनी भागात छापण्यात आले होते.
राज्यातील तीन पक्षाच्या सरकारचे खेड तालुक्यातील स्थानिक प्रतिनिधी एकत्र येणार का? यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. याची चर्चा सुरू झाली आहे.
दरम्यान, कर्म धर्म संयोगाने एका छत्राखाली आलो आहे. मतभेद विसरुन लोकांसाठी आपापल्या परीने विकास कामे आणा असे आवाहन राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार दिलीप मोहिते पाटील यांनी केले. हे आवाहन मोहिते पाटील यांनी खेड तालुक्यातील भाजप, शिंदे शिवसेनेच्या नेते, कार्यकर्त्यांना केले आहे.
खेड तालुक्यातल्या दोन्ही पक्षाच्या प्रमुख कार्यकर्त्यांबद्दल नेहमी टीकेचा सूर आळवणाऱ्या आमदार दिलीप मोहिते पाटील यांनी राज्याच्या सत्ताबदलानंतर नरमाईची भूमिका घेतल्याचे याद्वारे समोर आले आहे.