अभिनेते विक्रम गोखले : मोदी आणि छत्रपतींची तुलना चुकीचीच
पुणे -“कोणीही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तुलना छत्रपती शिवाजी महाराजांशी करावी, हे चुकीचेच. ही दोन्ही व्यक्तिमत्त्वांची तुलना अशक्य आहे. त्यामुळे मोदी हे आजचे छत्रपती आहेत किंवा शरद पवार हे जाणता राजा आहेत, अशी वक्तव्ये जे कोणी करत आहे ते चुकीचेच आहेत,’ असे मत अभिनेते विक्रम गोखले यांनी व्यक्त केले.
पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी गोखले यांना “पिफ डिस्टिग्विंश्ड ऍवार्ड’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. या निमित्त आयोजित वार्तालापात गोखले यांनी बुधवारी संवाद साधला. याप्रसंगी डॉ. श्रीराम लागू यांच्याविषयीच्या आठवणी, नाटक-चित्रपट क्षेत्रातील प्रवास आणि सामाजिक आणि राजकीय विषयांवर त्यांनी भाष्य केले. यावेळी जब्बार पटेल उपस्थित होते. सावरकरांवरील टीकेबद्दल गोखले म्हणाले, “सोनिया गांधी, राहुल गांधी यांनी सावरकरांबद्दल काही वाचन केले आहे का? त्यांना सावरकरांबद्दल बोलण्याचा काय हक्क आहे? काही सुबुद्ध लोकांकडून सावरकरांबद्दल अपप्रचार केला जातो. सावरकर ज्यांना कळलेच नाहीत, त्यांनी सावरकरांवर टीका करणे मला कधीच पटले नाही. ‘
सीएए, एनआरसीचे समर्थन
देशात राहणाऱ्या घुसखोरांकडून वापरल्या जाणाऱ्या सोयी-सुविधांवर ताण येतो. जे नागरिक प्रामाणिकपणे कर भरतात, त्यांच्या कराच्या पैशांतूनच या सुविधा मिळतात. आपण जो कर भरतो, तो घुसखोरांवर का खर्च करायचा? असा प्रश्न उपस्थित करत गोखले यांनी नागरिकत्व नोंदणी कायद्याचे समर्थन केले. तसेच देशात सध्या सुरू असलेला विरोध प्रदर्शन डाव्या विचारसरणीपुरस्कृत विरोध असून, डाव्या विचारसरणीच्या कार्यकर्त्यांकडून या विषयाला हवा दिली जात असल्याचा आरोप त्यांनी केला.