पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता कोणत्याही दिवशी लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे महापालिकेकडून सार्वजनिक ठिकाणचे राजकीय फ्लेक्स, बॅनर, पक्षांच्या जाहिराती काढून टाकण्याची यंत्रणा सज्ज ठेवली आहे. एका रात्रीत शहर फ्लेक्समुक्त करण्याचे नियोजन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
जिल्हा प्रशासनाने दिलेल्या आदेशानंतर ही तयारी करण्यात आली आहे. मनपाच्या सर्व क्षेत्रीय कार्यालयांना निवडणूक विभागाने हे आदेश दिले आहेत. आचारसंहिता लागू झाल्यानंतर सार्वजनिक ठिकाणी राजकीय जाहिरातींना बंदी घालण्यात येते. त्याअंतर्गत आचारसंहिता लागू झाल्याानंतर मालमत्ता विद्रुपास प्रतिबंध करण्यासाठी अधिनियम १९९५ अंतर्गत भिंतीवरील लेखन,
पोस्टर, पर्स किंवा कटआऊट, होर्डिंग्ज, बॅनर्स, झेंडे तसेच शासकीय बसेसवरील राजकीय जाहिराती, सार्वजनिक ठिकाणी जसे रेल्वे स्टेशन, बसस्टॅंड, विमानतळ, रेल्वेपूल, रस्ते, वीज-टेलिफोन खांब, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या इमारतीच्या भागातील जाहिराती काढण्याचे आदेश देण्यात आले आहे.
रंगवलेल्या भिंतीचा भार
शहराच्या वेगवेगळ्या भागात भाजपकडून खासगी तसेच सार्वजनिक भिंतीवर केंद्र शासनाच्या जाहिराती रंगविण्यात आल्या आहेत. विशेष म्हणजे, महापालिका प्रशासनाची मान्यता न घेताच या भिंती रंगवण्यात आल्या आहेत. त्यामुळे प्रशासनास या जाहिराती झाकण्यासाठी पुन्हा त्यावर रंगकाम करावे लागणार आहे. त्याचा मोठा आर्थिक फटका बसणार आहे. त्यातच अनेक भागांत जाहिरातींचे स्टीकर असल्याने ते काढण्यासाठीही मोठा खर्च प्रशासनास उचलावा लागणार आहे.