सातारा – दिल्ली भाजपचे नेते जय भगवान गोयल यांनी लिहिलेल्या “आज के शिवाजी – नरेंद्र मोदी” या पुस्तकाचे काल (दि. १२) प्रकाशन करण्यात आले. या पुस्तक प्रकाशनानंतर देशभरातून भाजपवर टीकेची झोड उठवली जात आहे.
तसेच या पुस्तकावर तत्काळ बंदी घालण्याची मागणीसह सोशल मीडियावरून संताप व्यक्त केला जात आहे. दरम्यान, मोदींच्या या पुस्तकावर सातारचे भाजप नेते छत्रपती शिवेंद्रराजे भोसले यांनीही आपले मांडले आहे.
शिवेंद्रराजे म्हणाले कि, “छत्रपती शिवाजी महाराजांची तुलना आपल्या कुणाशीही करता येणार नाही… तसंच हे पुस्तक थांबवण्यात यावं, अशी मागणी सुद्धा भाजप अध्यक्ष अमित शहा यांच्याकडे केली आहे”.
तसेच, “काही अतिउत्साही कार्यकर्त्यांनी हा प्रकार केला असावा. नरेंद्र मोदी हे देशाचे पंतप्रधान आहेत. मोदींनी त्यांची स्वत:ची प्रतिमा तयार केली आहे. ते अशा प्रकारे स्वत: कुणाला शिवाजी महाराजांसोबत तुलना करायला सांगणार नाहीत. मात्र या प्रकारामुळे पक्ष नेतृत्वावर टीका टिपण्णी होत आहे. पक्षश्रेष्ठींनी अशा लोकांना तात्काळ आला घालावा.” असं शिवेंद्रराजे भोसले म्हणाले आहे.
दरम्यान, या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा काल भाजप दिल्ली प्रदेश कार्यालयात एका कार्यक्रमात पार पडला. या पुस्तकात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तुलना थेट शिवाजी महाराजांशी केल्याची माहिती आहे. या कार्यक्रमाला भाजपचे प्रदेशाध्यक्ष मनोज तिवारी, प्रभारी श्याम जाजू, माजी खासदार महेश गिरी हे नेते उपस्थित होते.