डॉ. कसपटे ठरले सीताफळाचे पेटन्ट मिळवणारे देशातील पहिले शेतकरी

पुणे – बार्शी तालुक्‍यातील गोरमाळे येथील शेती संशोधक डॉ. नवनाथ कसपटे यांनी सीताफळाचे “एनएमके-1 गोल्डन’ हे नवीन वाण शोधून काढले आहे. या वाणाची भारत सरकारकडे अधिकृतपणे नोंदणी केली असून, केंद्रीय कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालयाच्या “पीक वाण संरक्षण व शेतकरी हक्क कायदा 2001′ अंतर्गत गोल्डन सीताफळाचे पेटन्ट डॉ. कसपटे यांना देण्यात आले आहे. सीताफळाचे पेटन्ट मिळणारे देशातील पहिले शेतकरी ठरले आहेत.

गोल्डन जातीच्या सीताफळामुळे शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढले असून, टिकावू, आकाराने मोठे आणि चवीला गोड असलेल्या सीताफळाला बाजारामध्ये देखील चांगली मागणी आहे. याबाबत कसपटे म्हणाले, बार्शी येथे 35 एकर शेतीमध्ये सीताफळाच्या तब्बल 42 विविध वाणाची लागवड करण्यात आली आहे. यामध्ये तब्बल 15 एकरमध्ये केवळ सीताफळांच्या विविध जातीची नर्सरी विकसित करण्यात आली आहे. कसपटे यांनी गोल्डन सीताफळाचे वाण विकसित करण्यासाठी सन 2001 मध्ये सुरुवात केली. हे वाण विकसित करण्यासाठी त्यांनी तब्बल दहा वर्ष प्रचंड मेहनत व शास्त्रशुद्ध अभ्यास केला.

त्यानंतर सन 2010 मध्ये अखेर सीताफळाची गोल्डन वाण विकसित झाले. सीताफळाच्या इतर सर्व वाणापेक्षा जास्त उत्पादन देणारे, चवीला गोड, रंग, देखणेपणा, जास्त टिकाऊ आणि कमी बिया असलेले हे फळ आहे. यामुळे सर्वसामान्य ग्राहकासह प्रामुख्याने ज्युस विक्रेते, पल्प तयार करणा-या व्यापाऱ्यांकडून मोठी मागणी असल्याचे कसपटे यांनी सांगितले. मार्केट यार्डातील व्यापारी रावसाहेब कुंजीर यांच्या गाळ्यावर या सीताफळाची आवक होत आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.