उंब्रज – पुणे बेंगलोर महामार्गावर शिवडे (ता. कराड) येथे अज्ञात ट्रकने हुलकावणी दिल्याने एसटी बस पलटी होऊन भीषण अपघात झाला. या अपघातात महाविद्यालयीन युवतींसह 25 हुन अधिक प्रवासी जखमी झाले आहे. एसटीतून 62 पेक्षाही अधिक प्रवासी प्रवास करत होते.
सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. दरम्यान, अपघातातील अपघातात जखमींवर उंब्रज येथील खासगी रुग्णालय व आरोग्य केंद्रात उपचार सुरु आहे.
अपघातात धनश्री संदीप जगताप (रा. उंब्रज ता. कराड), आकांक्षा दादासो पाटील (रा. नानेगांव बुद्रुक), स्वाती अरविंद गायकवाड (रा. सातारा), बबन भगवान पाटील (रा. सातारा), हणमंत रामचंद्र गोरे (रा.चोरे ता. कराड), लता कृष्णराव लोखंडे (रा. कोल्हापूर), आरती रामचंद्र पाटील (रा. नानेगाव बुद्रुक), जगन्नाथ विष्णू जांभळे (रा. शिवडे ता. कराड) यांसह अन्य प्रवासी जखमी झाले आहेत. पैकी काहीजण गंभीर असून उर्वरित किरकोळ जखमी आहेत. अन्य जखमींची नावे समजू शकले नाहीत.
अधिक माहिती अशी, शनिवार, 11 रोजी सांगली ते महाबळेश्वर ही बस (क्रमांक एम एच 14 बीटी 0490) सायंकाळी 5.30 च्या सुमारास शिवडे गावच्या हद्दीत पोहचली. एसटी वेगाने जात असताना शिवडे येथील उत्तरमांड नदीच्या पुलावर असणाऱ्या दुभाजकावर जोरात धडकली, ही धडक भीषण असल्याने दुभाजक असून एसटीची पुढील दोन चाके धडीसह तुटून पडली आहेत. अपघातानंतर बस दुभाजकाला धडकल्याने महामार्गावरच पलटी झाली.
या अपघातात एसटीमधील पंचवीस हुन अधिक प्रवाशी जखमी झाले. जखमींमध्ये महाविद्यालयीन विद्यार्थी, विद्यार्थ्यीनी, महिला, पुरुषांचा समावेश आहे. यातील काही प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. अपघातानंतर मोठा आवाज झाल्याने शिवडे व उंब्रज येथील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेवून एसटीतील जखमींना तातडीने बाहेर काढून नजीकच्या शारदा क्लिनिकमध्ये तसेच इतर खासगी दवाखान्यात उपचारासाठी दाखल केले आहे. तसेच उंब्रज प्राथमिक आरोग्य केंद्रात किरकोळ जखमींवर उपचार करण्यात आले.