उपाध्यक्षपदी भोरचे रणजित शिवतरे
पुणे – राष्ट्रवादीचे बहुमत असलेल्या पुणे जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी खेड तालुक्यातील निर्मला सुखदेव पानसरे, तर उपाध्यक्षपदी भोर तालुक्यातील रणजित शिवाजीराव शिवतरे यांची बिनविरोध निवड झाली. शनिवारी (दि. 11) दुपारी तीन वाजता निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत ही निवड करण्यात आली.
अध्यक्षपदाच्या शर्यतीमध्ये 18 महिला इच्छुक होत्या. त्यामध्ये आमदार दिलीप मोहिते यांच्या प्रयत्नामुळे खेड तालुक्याला अध्यक्षपदाचा बहुमान मिळाला. शनिवारी (दि. 11) सकाळी दोन्ही पदांसाठी निवडणूक प्रक्रिया सुरू झाली. पक्षाकडून जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर यांनी पानसरे आणि शिवतरे या दोघांची नावे जाहीर केल्यामुळे अर्ज भरण्याच्या वेळेत केवळ दोनच अर्ज निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे आले.
दरम्यान, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाच्या निवडीच्या अजेंड्यावर पहिल्या मजल्यावर निवड प्रक्रिया होणार असल्याचे सांगण्यात आले होते. मात्र प्रत्यक्षात पाचव्या मजल्यावर निवड प्रक्रिया घेण्यात आल्याने काही महिला सदस्यांनी आंदोलनाचा पवित्रा घेतला. त्यामुळे काहीवेळ तणावाचे वातावरण पसरले. ठीक तीन वाजता आयोजित सभेमध्ये दोनच अर्ज आल्यामुळे अध्यक्ष आणि उपाध्यक्षांची निवड बिनविरोध झाली.
नवनिर्वाचित जि.प. अध्यक्षा निर्मला पानसरे म्हणाल्या, राज्यात सर्वात मोठी असलेल्या जिल्हा परिषद अध्यक्षपदाचा बहुमान पक्षश्रेष्ठी शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे आणि आमदार दिलीप मोहिते यांच्यामुळे मिळाला. त्यांनी दाखविलेला विश्वास माझ्या कामातून सार्थ करून दाखवेन. सामान्य घटकांचा सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न करणार आहे. शेतकरी, महिला, तरुण, आदिवासी, दलित या सर्व घटकांसाठी काम करणार असून, त्यांच्या असलेल्या योजना त्यांच्यापर्यंत पोहचवण्यासाठी प्रयत्न करणार आहे, असे त्यांनी सांगितले.
पुणे शहराच्या सभोवताली आणि पूर्व, पश्चिम भागातील नागरिकांचे प्रश्न वेगळे आहेत. या पूर्वी जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने दर्जा सुधारण्याचा प्रयत्न केला. पीएमआरडीएचा विकास आराखडा तयार होत आहे. तो विकास आराखडा अवलोकनासाठी जिल्हा परिषदेकडे येणार आहे. त्यावेळी सर्वांना विश्वासात घेऊन आणि जनतेच्या हिताचा विचार करून सूचना हरकती नोंदवू. केवळ मुद्रांक शुल्क निधीवर अवलंबून न राहता, जिल्हा परिषदेने अन्य उत्पन्न वाढविण्यासाठी प्रयत्न केला जाईल. जिल्ह्यातील 498 पाणी योजनांना गती मिळेल, असे उपाध्यक्ष रणजीत शिवतरे यांनी सांगितले.