पुणे – महापालिकेकडून शहर फेरीवाला धोरणाची अंमलबजावणी करण्यात आल्यानंतर या धोरणानुसार, परवाना देण्यात आलेल्या पथारी व्यावसायिकांकडून शुल्क वसूल करण्यासाठी 2019-20 या आर्थिक वर्षात तब्बल 8 हजार व्यावसायिकांना थकबाकीची नोटीस बजाविली आहे. मात्र, गेल्या 9 महिन्यांत केवळ 4 हजार 800 व्यावसायिकांनीच थकबाकी भरली असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे अतिक्रमण विभागाकडून शहरात कडक कारवाई सुरू केल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली.
या धोरणानुसार, महापालिका प्रशासनाकडून शहरातील सुमारे 21 हजार व्यावसायिकांची नोंदणी करून त्यांना प्रमाणपत्र देण्यात आले आहे. त्यानंतर 2017 पासून यातील 8 हजार व्यावसायिकांचे पुनर्वसन करून त्यांना शहरात वेगवेगळ्या ठिकाणी महापालिकेने जागा दिली आहे. हे पुनर्वसन केल्यानंतर प्रशासनाकडून या व्यावसायिकांकडे 2017 पासूनच्या पथारी शुल्काची मागणी केली होती.