– नवनाथ बोरकर
डोर्लेवाडी (वार्ताहर) : बारामतीत आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा भव्य नागरी सत्कार होत आहे. यावेळी भव्य अशी मिरवणूक देखील निघणार आहे आणि या मिरवणुकीच्या दरम्यान अजित पवार यांना हेलिकॉप्टरच्या माध्यमातून पुष्पवृष्टी देखील करण्यात येणार आहे.
अजित पवारांनी 1982 साली सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळावरील निवडीनंतर राजकारणात सक्रिय प्रवेश केला. गेली 38 वर्ष अजित पवार हे या ना त्या कारणामुळे कायम चर्चेत असतात. राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांचे पुतणे आहे. तर अजित पवार हे एक वेळ खासदार, तर पाच वेळा आमदार झाले आहेत त्यांनी अनेक वेळा विविध मंत्रीपदे भूषविली आहे. मात्र एवढ्या मोठ्या प्रमाणात असा जंगी नागरी सत्कार केव्हाही झालेला नव्हता.
उपमुख्यमंत्री पद स्वीकारल्यानंतर बारामतीमध्ये अजित पवार यांच्या नागरी सत्कार समारंभाची जंगी तयारी पूर्ण झालेली आहे. त्यांच्या स्वागतासाठी भव्य दिव्य कमानी आणि भव्यदिव्य फ्लेक्स लावण्यात आले आहेत. अजित पवारांची बारामतीतून रॅली काढण्यात येणार आहे. त्या रॅलीदरम्यान व सत्कार समारंभ वेळेस हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी करण्यात येणार आहे. आजच्या अजित पवार यांच्या सत्कार समारंभामुळे बारामतीतील चाहते मात्र फारच आनंदीत असल्याचे चित्र दिसत आहे.