नवी दिल्ली : आदेनच्या आखातात भारतीय नौदलाच्या सुमेधा या जहाजाने संकटात सापडलेल्या खासगी बोटीतील 13 खलाशांची सुटका केली. ही घटना बुधवारी (दि8जानेवारी) घडली.
भारतीय नौदलाने दिलेल्या माहितीनुसार, भारतीय नौदलाच्या हेलीकॉप्टरला सहा जानरवारी रोजी अल हमीद ही पारंपरिक लाकडापासून बनवलेली बोट नजरेस पडली होती. या हेलिकॉप्टरमधून हि माहिती सुमेधा जाहजास देण्यात आली. त्यानंतर सोमालियाच्या किनाऱ्याजवळ या बोटीतील 13 भारतीय नागरिकांची सुटका करण्यात आली.
सुमेधा जाहजावरील तंत्रज्ञांच्या पथकाने अल हमीद बोटीची पाहणी केली आणि त्यांना तांत्रिक मदत पुरवली. त्यावेळी या बोटीच्या इंजिनमधील शाफ्ट तुटला असल्याचे निदर्शनास आले. त्याची दुरूस्ती समुद्रात शक्य नसल्याने ती बोट खेचून सोमालियाच्या हद्दीपासून दूर नेण्यात आली. अल हमीदच्या मालकानेही दरम्यानच्या काळात दुसरी बोट मदतीसाठी पाठवली. या दोन्ही बोटीतील कर्मचाऱ्यांना ताजे पाणी आणि वैद्यकीय सुविधा देण्यात आल्या.