कोची : भारतीय नौदलात सब-लेफ्टनंट शिवांगी यांनी पायलट म्हणून सोमवारी पदभार स्वीकारला. नौदलातील पहिल्या महिला पायलट आहेत. त्यांची येथील नौदलाच्या तळावर नियुक्ती करण्यात आली आहे.
नौदल दिनाच्या आधीच दोन दिवस त्यांच्या गणवेशावर नौदलाचे सन्मानचिन्ह लागले. हे ध्येय गाठल्यामुळे आपण आनंदी असल्याचे शिवानीने म्हटले आहे. हा माझ्यासाठी आणि माझ्या कुटुंबियांसाठी अभिमानास्पद क्षण आहे. एक वेगळीच भावना मनात दाटून आली आहे. या यशासाठी मी दीर्घकाळ संघर्ष करत होते. सरते शेवटी माझ्य कष्टाचे चीज झाले. मी ते व्यक्त करू शकत नाही आहे. पण फारच भारी वाटतंय. मी माझ्या प्रशिक्षणाचा तिसरा टप्पा पूर्ण करण्याकडे लक्ष देत आहे, असे कोचीत सेवेत रुजू झाल्यानंतर त्या पत्रकारांशी बोलत होत्या.
बिहारमधील मुझफ्फरापूर तेथे जन्मलेल्या शिवांगी नौदलाची डॉर्नियर गस्ती विमान चालवतील. नौदलात महिला होत्याच. पण, त्या कॉकपिटमध्ये नव्हत्या. हे काहीसं वेगळं आहे. कॉकपीटमध्ये महिला हे प्रथमच घडतंय. संरक्षण दलात येऊ इच्छिणाऱ्या महिलांन त्यामुळे नवीन द्वारे खुली होत आहेत. त्या आता हेलिकॉप्टर्स किंवा लढाऊ विमाने चालवतील, असे त्यांनी म्हटले.
शिवांगीच्या आधी भारतीय हवाई दलात, विंग कमांडर एस. धामी यांचा समावेश झाला आहे. देशातील फ्लाईट कमांडर होणाऱ्या त्या पहिल्या महिला आहेत. युनिटमध्ये कमांडींग ऑफिसरच्या पाठोपाठ दुसऱ्या क्रमांकाची जागा फ्लाईट कमांडरची असते.