– नौदलप्रमुख ऍडमिरल करमबीर सिंग यांची माहिती
नवी दिल्ली : भारतीय नौदलाकडे तीन विमानवाहू नौका असाव्यात अशी नौदलाची दीर्घकालीन योजना असल्याचे नौदल प्रमुख ऍडमिरल करमबीर सिंग यांनी मंगळवारी सांगितले.
संपूर्ण देशी बनावटीची पहिली विमानवाहू नौका 2022 पासून पूर्णपणे कार्यान्वित होईल, असेही त्यांनी सांगितले. नौदलाच्या वार्षिक पत्रकार परिषदेमध्ये ते बोलत होते. देशापुढील संरक्षणाच्या आव्हानांचा मुकाबला करण्यासाठी नौदल पूर्णपणे सज्ज असल्याचेही त्यांनी सांगितले.
तीन विमानवाहू नौका हा नौदलाच्या दीर्घकालीन योजनेचा भाग आहे. 2022 पर्यंत सक्रिय होणाऱ्या भारतीय बनावटीच्या विमानवाहू नौकेवर “मिग-29 के’ विमाने तैनात असतील. नौदलासाठी वार्षिक आर्थिक तरतूद गेल्या पाच वर्षात 18 टक्क्यांवरून 13 टक्क्यांपर्यंत कमी झाली आहे. मात्र आपल्या शेजारील देशांच्या कोणत्याही कृत्याचा आपल्यावर परिणाम होणार नाही, असेही त्यांनी सांगितले.
चीनच्या नौदलाच्या विस्तारतावादी भूमिकेबाबत विचारले असता, चीनी नौदल त्यांच्या क्षमतेनुसार विस्तार करत आहे आणि भारतीय नौदल आपल्या क्षमतेनुसार प्रगती करत असल्याचे ऍडमिरल सिंग यांनी सांगितले. समविचारी देशांबरोबर काम करण्यास आम्ही तयार आहोत. भारतीय सागरी क्षेत्रामध्ये 7 ते 8 चिनी जहाजे सर्वसाधारणपणे उपस्थित असतात. हिंद प्रशांत भागात स्थिरता राखण्याची नौदलाची भूमिका आहे, असे ते म्हणाले.
सप्टेंबरमध्ये चिनी जहाजाला हाकलले
अंदमानजवळ अलीकडेच घुसलेल्या चिनी नौदलाच्या एका जहाजास भारताच्या विशेष आर्थिक क्षेत्रापासून हाकलून देण्यात आले. शी यान 1 हे संशोधन जहाज सप्टेंबरमध्ये भारतीय सागरी हद्दीमध्ये घुसले होते. भारतीय नौदलाच्या पूर्वपरवानगीशिवाय हे जहाज त्या भागात गेले होते. हे जहाज भारतीय पाण्यात काही संशोधन उपक्रम राबवित असल्याचे सूत्रांनी सांगितले. परंतु हे जहाज हेरगिरी करत असल्याचा संशय आल्यानंतर त्याला माघार घ्यायला भाग पाडले गेले, असे लष्करी सूत्रांनी सांगितले. अशा घुसखोरीबाबत अत्यंत कठोरपणे कारवाई केली जाईल, असेही नौदल प्रमुखांनी सांगितले.