पिंपरी – पिंपरी चिंचवड शहरात असणाऱ्या अनधिकृत बांधकामधारकांवर शास्तीकराची टांगती तलवार आहे. भाजपाने लोकसभा, विधानसभा व स्थानिक निवडणुकीत शास्तीकर माफीचे आश्वासन दिले. मात्र फसवे जीआर दाखवून शास्तीकर माफी जाहीर केली आणि भाजपाच्या आमदार, खासदारांनी जाहिरातबाजी करून साखर, पेढे वाटून नागरिकांची फसवणूक केली. महाविकास आघाडीकडून शास्तीकर माफी कृती समिती पूर्ण शास्तीकर माफीचा निर्णय घेतल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, असे प्रतिपादन नगरसेवक दत्ता साने यांनी केले.
साने यांनी शहरातील शास्तीकरधारकांचा मेळावा गुरुवारी (दि. 26) आकुर्डीतील खंडोबा मंदिर घेतला. या वेळी दत्ता साने यांच्या नेतृत्वाखाली कृती समिती स्थापन करण्यात आली. या मेळाव्यास नगरसेविका संगीता ताम्हाणे, पौर्णिमा सोनवणे, नगरसेवक प्रवीण भालेकर, माजी नगरसेवक मारुती भापकर, सामाजिक कार्यकर्ते मानव कांबळे, गणपत आहेर, अण्णा सोनवणे, प्रवीण शिंदे, यशवंत साने, ज्ञानेश्वर मुरकुटे, विशाल जाधव, संदेश नवले आदी उपस्थित होते.
साने म्हणाले, महापालिका क्षेत्रात हजारो अनधिकृत बांधकामे आहेत. या अनधिकृत व वाढीव बांधकामांना महापालिकेने मिळकतकरामध्ये बेकायदेशीरपणे शास्तीकर आकारला आहे. भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी व शहरातील आमदारांनी शास्तीकर माफ केला अशी नागरिकांची दिशाभूल केली. शहरातील गोरगरीब कष्टकरी कामगार मिळकतधारक शास्तीकर माफीच्या लाभापासून वंचित राहिला. या सर्व बाधितांना आता महाविकास आघाडीच्या माध्यमातून न्याय मिळवून देऊ, असा निर्धार माजी विरोधी पक्षनेते नगरसेवक दत्ता साने यांनी यावेळी केला.