वडोदरा : पुणे शहरातील एका सोनाराच्या दुकानतून 10 लाख रुपयांच्या दागिन्यांची चोरी केल्याप्रकरणी दोन चोरट्यांना वडोदरा येथून अटक करण्यात आली आहे.
वडोदरा गुन्हे शाखेच्या पोलिसांनी शुक्रवारी वडोदरा रेल्वेस्टेशन परिसरातील गेस्ट हाऊसमधून सुशिल अशोक माधरे आणि अमित सुदर्शन प्रसाद चौधरी या दोघांना अटक केली, अशी माहिती गुन्हे शाखेचे निरीक्षक जे.जे.पटेल यांनी दिली.
या आरोपींनी 24 नोव्हेंबर रोजी पुण्यातील कोथरूड भागातील दागिन्यांच्या दुकानातून 10.19 लाख रुपयांपेक्षा अधिक किंमतीचा ऐवज चोरला होता. दुकानातील सीसीटिव्हीमध्ये हे दोघेजण आढळले होते. माधरे हा बडतर्फ केलेला पोलीस शिपाई आहे.
महाराष्ट्रात झालेल्या दरोडेखोरीच्या तीन प्रकरणात तो सहभागी आहे.
हे दोघे गेल्या महिन्यापासून फरार होते आणि दिल्ली आणि कोलकाता येथे थांबले होते. नंतर ते वडोदरा येथे आले होते. पोलिसांनी आरोपींकडून एक रायफल, तीन काडतुसे, एक चाकू आणि दोन मंगळसूत्रे जप्त केली आहेत, असेही पटेल यांनी सांगितले.