कराची : सलामीवीर आबिद अलीच्या दीडशतकी तर शान मसूदच्या शतकी खेळीच्या जोरावर पाकिस्तानने मालिकेतील दुस-या कसोटी क्रिकेट सामन्यात दुस-या डावात तिस-या दिवसअखेर २ बाद ३९५ अशी मजल मारली आहे. त्यामुळे पाकिस्तानकडे ३१५ धावांची मजबूत आघाडी झाली आहे.
Stumps on Day 3: Pakistan on 395/2 (104 Ov) Babar Azam 22*, Azhar Ali 57*, lead by 315 runs. #PAKvSL pic.twitter.com/8NrA4rT7qk
— Sri Lanka Cricket 🇱🇰 (@OfficialSLC) December 21, 2019
दुस-या डावात कालच्या बिनबाद ५७ धावावरून पुढे खेळताना पाकने आपली पहिली विकेट २७८ धावांवर गमावली. लहिरू कुमारा याने फर्नांडोकरवी शान मसूदला झेलबाद करत पाकला पहिला धक्का दिला. शान मसूदने १९८ चेंडूत ७ चौकार आणि ३ षटकारासह १३५ धावा केल्या. त्यानंतर आबिद अली आणि अजहर अली यांनी दुस-या विकेटसाठी ७७ धावांची भागिदारी करत संघाची धावसंख्या ३५५ वर नेली. लहिरू कुमारनेच आबिद अलीला पायचीत करत दुसरी विकेट घेतली. आबिद अलीने २८१ चेंडूत २१ चौकार आणि १ षटकारासह १७४ धावांची खेळी केली.
त्यानंतर अजहर अली आणि बाबर आझमने डाव सावरत तिस-या दिवसअखेर संघाची धावसंख्या ३९५ नेली. तिस-या दिवसाचा खेळ थांबला तेव्हा अजहर अली ५७ आणि बाबर आझम २२ धावांवर खेळत होता.
संक्षिप्त धावफलक : पाकिस्तान : पहिला डाव – सर्वबाद १९१ आणि दुसरा डाव – १०४ षटकांत २ बाद ३९५ ( शान मसूद १३५, आबिद अली १७४, अजहर अली ५७* आणि बाबर आझम २२* वर खेळत आहे. लहिरू कुमार ८८/२) वि. श्रीलंका : पहिला डाव – सर्वबाद २७१.