नवी दिल्ली : भाजपचा खासदार बनलेला माजी क्रिकेटपटू गौतम गंभीर याला फोनवरून जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. गंभीरला एका आंतरराष्ट्रीय फोन क्रमांकावरून शुक्रवारी ती धमकी देण्यात आली. त्याने त्याविषयीची माहिती दिल्ली पोलिसांना पत्र पाठवून दिली.
आपल्या कुटूंबियांच्या सुरक्षेची निश्चिती करण्याचे आवाहन त्याने पोलिसांना केले आहे. तो लोकसभेत पूर्व दिल्ली मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतो. दिल्लीत सध्या नागरिकत्व दुरूस्ती कायद्याविरोधात निदर्शनांचे सत्र सुरू आहे. तशातच गंभीरला देण्यात आलेल्या धमकीचा विषय पोलिसांनी गांभीर्याने घेतला आहे.
त्याला कुठल्या कारणावरून धमकी देण्यात आली ते तातडीने स्पष्ट होऊ शकले नाही. धमकी देणाऱ्या कॉलरपर्यंत पोहचण्याचा प्रयत्न पोलीस करत असल्याची माहिती सुत्रांकडून देण्यात आली.