तीन महिलांवर गुन्हा दाखल, आरोपी तृतीयपंथी
पिंपरी – रात्रीच्यावेळी महिला समजून मदतीच्या उद्देशाने लिफ्ट देणे एका नागरिकाला चांगलेच महागात पडले. लिफ्ट मागून मोटारीत बसलेल्या तीन महिला चोरट्यांनी शस्त्राचा धाक दाखवून मोटार चालकास लुटले. ही घटना प्राधिकरण येथे घडली. परंतु तपासात या महिला नसून तृतीयपंथी असल्याचे निष्पन्न झाले आहे.
गणेश नानासाहेब देशमुख (वय 49, रा. साई पूजाबाग, दत्तवाडी, आकुर्डी) यांनी बुधवारी (दि.18) निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी तीन महिला चोरटयांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दाखल केलेल्या फिर्यादीनुसार, मंगळवारी (दि. 17) रात्री दहा वाजताच्या सुमारास फिर्यादी देशमुख हे आपल्या मोटारीतून घरी चालले होते. ते प्राधिकरणातील बंद बीआरटी रस्त्याजवळ असलेल्या कृष्णा हॉटेल समोर आले. त्यावेळी त्यांना तीन महिलांनी लिफ्ट मागितली. त्यानंतर त्या महिला मोटारीत बसल्या. देशमुख यांना ब्लेडचा धाक दाखवून त्याच्याकडील चार तोळे वजनाच्या सोन्याच्या दोन अंगठ्या, सोनसाखळी व रोख रक्कम असा 95 हजार रुपयांचा ऐवज जबरदस्तीने काढून घेतला. सहाय्यक पोलीस निरीक्षक लक्ष्मण सोनावणे याबाबत अधिक तपास करीत आहेत.
तपास करताना आरोपी महिला नसून तृतीयपंथी असल्याचे समोर आले आहे. लवकरच आम्ही त्यांना अटक करू, असा विश्वास वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील टोणपे यांनी व्यक्त केला आहे.