“ओडीएफ प्लस प्लस’ मानांकनासाठी प्रयत्न सुरू
सातारा – स्वच्छ सुंदर भारत अभियानात देशपातळीवर 45 व्या स्थानांवर राहिलेल्या सातारा पालिकेने मानांकन सुधारण्यासाठी कंबर कसली आहे. यावर्षी ओडीएफ प्लस प्लस या मानांकनासाठी साताऱ्यात वीस बायो टॉयलेटस् उभारण्यात येणार असून स्वच्छ सुंदर साताऱ्यासाठी आरोग्य विभागाने नवीन आराखडा तयार केला आहे.
गतवर्षी साताऱ्यात स्वच्छ भारत अभियानाचा नुसताच कागदोपत्री बोभाटा झाला. स्वच्छ भारत अभियानाच्या टेंडर वाटपातच राजकीय धुम्मस उडाल्याने सातारा शहराची प्रत्यक्ष सफाई मोहीम नक्की कशी झाली? हे आजही गुलदस्त्यात आहे. मात्र आरोग्य विभागाने यंदा स्वच्छ भारतच्या पहिल्या टप्प्यासाठी साताऱ्यात बायो टॉयलेटचा संकल्प सोडला आहे.
यासाठी सातारा शहरातील पालिकेच्या मालकीची अठरा शौचालये निवडण्यात आली आहेत. यासाठी आरोग्य विभागाने पूर्व, पश्चिम, उत्तर, दक्षिण, उत्तर -पूर्व, दक्षिण-पश्चिम असे सहा विभाग करण्यात आले आहेत. आरोग्य सभापती विशाल जाधव व उपमुख्याधिकारी संचित धुमाळ यांनी आरोग्य विभागाची बैठक घेऊन अठरा बायोटॉयलेटच्या उभारणीचे स्वतंत्र नियोजन केले आहे.
सती आई मंदिर करंजे कमान, व मुक्तांगण एलबीएस कॉलेजजवळ सर्वात मोठे सोळा सिटरचे टॉयलेट बनवले जाणार आहे. जुनी भाजी मंडई सदाशिव पेठ, राजवाडा बस स्टॅन्ड भवानी पेठ, मार्केट यार्ड रविवार पेठ, सातारा बस स्टॅन्ड रविवार पेठ, येथे प्रत्येकी दहा सीटर, आमणे घर सदर बझार सातारा, लेवे घर चिमणपुरा पेठ, सावकार गॅरेज शेटे चौक व तुपे घर सदर बझार येथे प्रत्येकी आठ सीटरचे शौचालय उभे केले जाणार आहे.
आंबेकर दारू दुकान येथे सहा सीटर, म्हाडा कॉलनी सदर बझार, 909 शनिवार पेठ भावे बोळ, गवंडी आळी सातारा, खडकेश्वर शाळा यादोगोपाळ पेठ, राजवाडा चौपाटी भवानी पेठ, गोडोली नाका सातारा, तरडे घर शाहू गार्डन येथे प्रत्येकी चार सीटरचे शौचालय उभारले जाणार आहे.
ओडीएफच्या मानकाप्रमाणे दहा पैकी प्रत्येकी दोन टॉयलेट कमोड सिस्टिममध्ये असायला हवेत. याशिवाय शौचालय पुरुष व स्त्रियांसाठी स्वतंत्र फलक, मुबलक पाण्याची व विजेची सोय, शौचालयाबाहेर सॅनिटरी व्हेडिंग मशीन, स्वच्छ भारत अभियानाचा संदेश देणाऱ्या शौचालयाच्या बोलक्या भिंती, सांडपाण्याचा स्वतंत्र निचरा, प्रत्येक बायो टॉयलेटच्या बाहेर वृक्षारोपण व प्रत्येक शौचालयाला स्वतंत्र केअर टेकर अशा विविध मानकानुसार एकूण अठरा व काही ठिकाणी प्रायोगिक तत्वावर पे अँड यूज टॉयलेटची उभारणी करण्यात येणार आहे. स्वच्छ भारत अंर्तगत स्वतंत्र वित्त व्यवस्था करण्यात येणार असून ओडीएफ प्लस प्लस मधील हा सर्वात महत्वाचा टप्पा असून त्यानुसार सातारा पालिकेचा आरोग्य विभाग कामाला लागला आहे.
आपल्या मालमत्तेचे आपणच काळजीवाहू
बायो टॉयलेट ही संकल्पना केवळ स्वच्छ भारत अभियानापुरती मर्यादित नाही. नागरिकांच्या स्वच्छतेविषयक जाणीव विकसित होऊन परिसर स्वच्छ रहावा ही ओडीएफ योजनेची मूळ संकल्पना असल्याचे उपमुख्याधिकारी संचित धुमाळ यांनी सांगितले.
शौचालय आणि त्याच्या सुविधांची जपणूक सातारकरांनी आपली जबाबदारी म्हणून करावी असे आवाहन आरोग्य विभागाच्यावतीने करण्यात आले आहे. शौचालयाची तोडफोड, सुविधांची चोरी भिंतीवर शेरेबाजी असे प्रकार घडल्यास कठोर कारवाईचा इशारा पालिकेच्यावतीने देण्यात आला आहे.