सातारा – सातारा पालिकेच्या कर्मचाऱ्यांनी पालिकेच्या कामकाजावर बहिष्कार टाकल्याने स्थायी समितीच्या सभेत सोमवारी सव्वा कोटीच्या पॅचिंगच्या बारा विषयांना मंजुरी देण्यात आली. 91 विषय स्थगित करण्यात आले.
नगराध्यक्ष माधवी कदम सभेच्या अध्यक्षस्थानी होत्या. मुख्याधिकारी शंकर गोरे व सर्व विषय समित्यांचे सभापती सभेला उपस्थित होते. कमिटी हॉलमध्ये दीड तासाच्या विलंबाने सुरू झालेल्या सभेमध्ये सभा सचिव विषय वाचनाला उपस्थित नव्हते. पालिकेतील स्थायी समितीच्या कामकाजावर ठरल्याप्रमाणे बहिष्कार टाकण्यात आला होता.
विषय वाचन व सूचनांच्या टिप्पणी देण्यासाठीसुध्दा कर्मचारी कमिटी हॉलमध्ये न आल्याने सातारा शहरातील वीस प्रभागातील एक कोटी वीस लाख रुपयांचे पॅचिंगचे बारा विषय केवळ पंधरा मिनिटाच्या चर्चेत मंजूर करण्यात आले. कर्मचाऱ्यांच्या बहिष्कारांमुळे अजेंड्यावरील 91 विषयांची स्थायी सभा तहकूब करण्यात आली, ही स्थायी सर्व पुन्हा घेण्याचा निर्णय घेण्यात आला.
राजमाता कल्पनाराजे भोसले थेट पालिकेत
राजमाता कल्पनाराजे भोसले यांनी सोमवारी सकाळी दहा वाजता नगराध्यक्ष माधवी कदम यांच्या दालनात सातारा विकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांना पाचारण केले. कोणाच्या दबावात काम करू नका, काही अडचणं असेल तर थेट कारवाईची हिंमत ठेवा, असा स्पष्ट सल्ला राजमाता कल्पनाराजे भोसले यांनी दिला. सभागृहाची उंची कमी होईल असे कोणतेही काम आपल्या हातून घडणार नाही याची काळजी घेण्याची सूचना राजमातांनी केली.
या बैठकी दरम्यान मल्हार पेठेतील काही महिला सभागृहाच्या बाहेर उपस्थित झाल्या. शौचालय दुरुस्तीच्या मागणीसाठी महिलांनी थेट दाद मागितल्याने राजमाता थेट सभागृहातून उठून बाहेर आल्या. महिलांच्या या घाईबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली. मात्र त्यांची मागणी तातडीने पूर्ण करण्याची सूचना त्यांनी नगराध्यक्षांना केली.