गोंदवले – श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज पुण्यतिथी महोत्सव कालावधीत गोंदवले बुद्रुक येथे रस्त्यालगत होणाऱ्या बेशिस्त वाहन पार्किंगमुळे सातारा-पंढरपूर रस्त्यावर दिवसा वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी पोलीस यंत्रणा सज्ज आहे. त्याचबरोबर रात्रीही वाहनांच्या चुकीच्या पार्किंगबाबत पोलिसांकडून उपाययोजना करण्यात येत आहेत. मात्र, पार्किंग व वाहतुकीवर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलीस कर्मचाऱ्यांची अधिक वेळ नेमणूक व्हावी, अशी मागणी होत आहे.
श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज समाधी मंदिर सातारा-पंढरपूर रस्त्यालगत आहे. येथे दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांच्या वाहनांसाठी समाधी मंदिर समिती व ग्रामपंचायतीने स्वतंत्र वाहनतळ केले आहेत. मात्र, बहुतांशी भाविक वाहने रस्त्यावरच उभी करत असल्याने दिवसा वाहतूक कोंडी होऊ नये म्हणून पोलीस यंत्रणा सज्ज असते; परंतु रात्री पोलीस नसल्याने भाविक रस्त्याकडेला वाहने उभी करत असल्याने व्यापारी व ग्रामस्थांबरोबरच भाविकांनाही वाहतूक कोंडीचा त्रास सहन करावा लागतो.
सध्या श्रींचा पुण्यतिथी महोत्सव सुरू असल्याने भाविकांची गर्दी आहे. या पार्श्वभूमीवर रात्रीच्या वेळी होणाऱ्या बेशिस्त वाहन पार्किंगबाबत उपाययोजना कराव्यात, या मागणीची दखल घेत पोलीस कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे. अनेक भाविक रात्रीच्या वेळी दर्शनासाठी येत असल्याने गर्दी वाढत आहे. मंदिरालगतच्या रस्त्यावर रात्री वाहने उभी करण्यास पोलिसांकडून मज्जाव केला जात आहे; परंतु पोलीस कर्मचारी रात्री उशिरापर्यंत थांबल्यास नंतर होणारी वाहतूक कोंडी टाळण्यास मदत होईल.