प्रशासकीय हालचाली : शिक्षण संचालकांकडून अहवाल मागवला
पुणे – हिवाळ्यात राज्यातील विद्यार्थ्यांच्या आरोग्य आणि सुरक्षेसाठी शाळेच्या वेळेत बदल करण्याबाबत शिक्षण आयुक्त कार्यालयाने प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालकांकडून अहवाल मागविला आहे.
दरवर्षी हिवाळयात थंडीच्या कडाक्यात पहाटे विद्यार्थ्यांना शाळांमध्ये येण्यास अडचणी निर्माण होतात. धुके व अंधाराचे वातावरण असल्याने विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचाही प्रश्न अनेकदा निर्माण होतात. याप्रमाणेच शाळांच्या वेळेत बदल करुन सकाळी शाळा किमान एक तास उशिरा भरवण्यात याव्यात, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पुणे जिल्हाध्यक्ष प्रशांत कनोजिया, ऍड. सचिन पवार, शैलेश विटकर, रवि बनसोडे, रुपेश घोलप, शहर उपाध्यक्ष अमोल शिंदे, अमेय बलकवडे, सचिन ननावरे आदी पदाधिकाऱ्यांनी शिक्षण आयुक्त विशाल सोळंकी यांच्याकडे केली आहे.
याची दखल घेत शिक्षण आयुक्तांनी योग्य कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार प्रभारी शिक्षण उपसंचालक अनुराधा ओक यांनी प्राथमिक शिक्षण संचालक दत्तात्रय जगताप, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालक दिनकर पाटील यांना अभिप्राय सादर करण्याबाबतचे पत्र पाठवले आहे.