कराड – बॅंकेत ताबडतोब केवायसी सादर करा, मी बॅंक मॅंनेजर बोलतोय, असे सांगून एका नामांकित महाविद्यालयाच्या प्राचार्याची तीन लाख 18 हजार रुपयांची फसवणूक केल्याची घटना मंगळवारी सकाळी साडेअकरा वाजण्याच्या सुमारास घडली. याबाबत कराड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, कराडमधील एका नामांकित महाविद्यालयाच्या प्राचार्याला मंगळवारी सकाळी 9 वाजण्याच्या सुमारास एका तोतयाने फोन केला. त्यावेळी संबंधित प्राचार्य महाविद्यालयात होता. मी बॅंक मॅंनेजर बोलतोय. तुमचा पॅनकार्ड नंबर व बॅंक खाते नंबर यासाठी नोंदविलेली जन्मतारीख वेगळी आहे. तुम्ही ताबडतोब केवायसी सादर करणे गरजेचे आहे, असे तोतयाने सांगितले. तेव्हा प्राचार्याने बॅंकेत जाऊन केवायसीची कागदपत्रे देतो, असे सांगितले.
मात्र, तोतया बॅंक मॅनेजरने मेसेजद्वारे लिंक पाठवत असून त्या लिंकद्वारे माहिती सादर करावी, असे सांगितले. प्राचार्याला मोबाइलवर मेसेजद्वारे लिंक मिळाल्यावर त्याने त्या लिंकवर केवायसीची माहिती पाठविली. त्यानंतर साडेअकरा वाजता प्राचार्याच्या बॅंक अकाउंटमधून एक लाख 49 हजार 999 रुपये कोणाच्या तरी नावावर ट्रान्सफर झाल्याचा मेसेज मोबाइलवर आला. त्यानंतर 11.48 मिनिटांनी पुन्हा अकाउंटमधील एक लाख 69 हजार रुपये ट्रान्सफर झाल्याचा मेसेज आला. त्यामुळे प्राचार्यांनी बॅंकेच्या शाखेत जाऊन खात्री केली असता तोतयाने तीन लाख 18 हजार 999 रुपयांची फसवणूक केल्याचे समजले.