कराड – गेल्या काही दिवसांपासून तालुक्यात असलेले ढगाळ वातावरण गुरुवारी दुपारपासून पूर्ववत झाले. त्यामुळे दोन दिवसापासून थंडीची चाहूल लागली आहे. पाऊस मोठा पडल्याने थंडीही जास्त पडणार असल्याने बाजारात ब्लॅंकेट खरेदीसाठी गर्दी होऊ लागली आहे.
साधारणत: नोव्हेंबर ते फेब्रुवारी या चार महिन्याचा काळात थंडी असते. मात्र वातावरणातील बदलामुळे यंदा डिसेंबरचा पहिला आठवडा आला तरी थंडी पडली नव्हती. अवकाळी पाऊस व ढगाळ वातावरण असल्याने त्याचा थेट परिणाम थंडीवर झाला होता. मात्र गेली दोन दिवसापासून तालुक्यात थंडी जाणवू लागली आहे. येणाऱ्या काळात थंडीची तीव्रता वाढणार असल्याने थंडीपासून बचाव करण्यासाठी बाजारपेठेत ब्लॅंकेटच्या खरेदीसाठी गर्दी होऊ लागली आहे.
हरियाणा मधील पानिपत येथे तयार झालेले ब्लॅंकेट विक्रीसाठी ढेबेवाडी फाटा, कोल्हापूर नाका, बस स्थानक परिसर, दत्त चौक, कृष्णा नाका या परिसरात दाखल झालेले आहेत. या स्टॉलवर एसी ब्लॅंकेट, बुरनुस च्या सिंगल जोडी, डबल जोडी अशा वेगवेगळ्या प्रकारांमध्ये ब्लॅंकेटची विक्री सुरू आहे. यातील एसी ब्लॅंकेट हे तिन्ही ऋतूत वापरता येत असल्याने या ब्लॅंकेटला जादा मागणी आहे. दिसायला आकर्षक, टिकाऊ आणि सर्वसामान्यांच्या बजेटमध्ये याच्या किंमती असल्याने दुकानातून महागडे अंथरूण-पांघरूण खरेदी करण्यापेक्षा स्वस्तात व टिकाऊ ब्लॅंकेट खरेदीसाठी सर्वसामान्यांचा ओढा वाढत आहे.
यंदा मोठ्या प्रमाणावर पाऊस पडल्याने पावसाचे पाणी जमिनीत मुरले आहे. परिणामी येणाऱ्या काळात थंडीचे प्रमाण साहाजिकच वाढणार आहे. मध्यंतरी ढगाळ वातावरणामुळे व अवकाळी पाऊस पडल्याने अपेक्षित वेळी थंडी सुरु झालेली नाही. मात्र गेल्या दोन दिवसापासून सूर्यप्रकाश लख्ख पडत असल्याने रात्री उशिरा व पहाटे धुक्याची चादर दिसू लागली आहे. या पार्श्वभूमीवर हरियाणा मधील पानिपत येथे तयार झालेले ब्लॅंकेट विक्रीसाठी आलेले आहेत. हे विक्रेते गेल्या आठ दिवसापासून शहरात ब्लॅंकेट विक्री करत आहेत. याआधी त्यांना हवा तसा प्रतिसाद मिळाला नव्हता, मात्र थंडीची तीव्रता वाढू लागल्याने खरेदीसाठी प्रतिसाद मिळत आहे.