विवाहितेवर अत्याचार करणाऱ्या तीन नराधमांना अटक

 उंब्रज  – पाटण तालुक्‍यातील एका गावातील 26 वर्षीय विवाहितेचा अश्‍लील फोटो काढून बदनामी करण्याची धमकी देत कराड तालुक्‍यातील तिघांनी पीडितेवर वेगवेगळ्या ठिकाणी अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी उंब्रज पोलिसांनी गणेश बजरंग माने (वय 19), अभिजित माने (वय 25, रा. कचरेवाडी, ता. कराड) व बबन उर्फ रियाज रमजान इनामदार (वय 27, रा. रिकिबदारवाडी, ता. कोरेगाव) या संशयितांना अटक केली असून न्यायालयाने त्यांना पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

या प्रकरणी पीडितेने दिलेल्या फिर्यादी म्हटले आहे की, गणेश माने याने माझा मोबाईल नंबर मिळवला. माझ्याकडे तुझे अश्‍लील फोटो असून ते तुझ्या नवऱ्याला दाखवून बदनामी करेन. तुझे जीवन उद्‌ध्वस्त करेन, अशी धमकी मोबाईलवरून देत तिला ऑगस्ट महिन्यात काशिळ येथे बोलावून घेतले. तेथून खराडे गावातील शेतात नेऊन तिच्यावर अत्याचार केला. त्यानंतर अभिजित माने याने ऑक्‍टोबर महिन्यात पीडितेस फोन करून काशिळ येथे बोलावून घेतले. तेथून दुचाकीवरून उंब्रज येथे एका लॉजवर नेऊन अत्याचार केला.

त्यानंतर बबन उर्फ रियाज इनामदार याने पीडितेशी गणेश माने याच्या मोबाईलवरून एक महिन्यापासून वरचेवर संपर्क साधला. व्हॉटस्‌ऍपवरील अश्‍लील चॅटिंग करून दि. 11 नोव्हेंबर रोजी तारळ्यात बोलावून घेतले. तेथून तिला दुचाकीवरून उंब्रजपासून काही अंतरावर महामार्गाच्या कडेला असलेल्या एका लॉजवर नेले. तिथे त्यानेही पीडितेवर अत्याचार केला. त्यानंतर तिघांनीही पीडितेला धमकावले. कोणाला काही सांगितले, तर तुझे फोटो तुझ्या पतीला व व्हॉटस्‌ऍप ग्रुपवर पाठवण्याची धमकी दिली. सहाय्यक पोलीस निरीक्षक अजय गोरड तपास करत आहेत. दरम्यान, हैदराबाद घटनेच्या पार्श्वभूमीवर पाटण तालुक्‍यातील या घटनेने संताप व्यक्‍त होत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.