थोरल्या पवारांवर भरोसा : सुनील शेळके राष्ट्रवादी कॉंग्रेससोबत असल्याचे अधोरेखित
पिंपरी (प्रतिनिधी) – राष्ट्रवादी कॉंग्रेसचे विधिमंडळाचे नेते अजित पवार यांच्या भारतीय जनता पक्षाला पाठिंब्याने राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. अजित पवार यांचा भाजपसोबत जाण्याचा निर्णय वैयक्तिक असल्याचे सांगत शरद पवार यांनी पक्षाची भूमिका स्पष्ट केली. दरम्यान, राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या तिकीटावर निवडणूक लढविली आहे, त्यामुळे मी पक्षासोबत राहणार आहे, असे मावळ विधानसभा मतदार संघाचे आमदार सुनील शेळके यांनी स्पष्ट केले आहे, त्यामुळे “मावळ’ राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात अर्थात शरद पवार यांच्यासोबतच राहणार असल्याचे एकार्थाने सुनील शेळके यांनी अधोरेखित केले आहे.
मुंबईतील राजभवनात शनिवारी (दि. 23) सकाळी देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी अनुक्रमे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. त्यावेळी मावळचे आमदार शेळके उपस्थित होते. मात्र शपथविधी अटोपल्यानंतर सुनील शेळके यांनी शरद पवार यांची वाय. बी. सेंटरमधील पत्रकार परिषद गाठली. पत्रकार परिषदेला उपस्थित राहून आम्ही शरद पवारांसोबत असल्याचे निदर्शनास आणून दिले आहे.
गेल्या 25 वर्षांत मावळमध्ये भारतीय जनता पक्षाचे कमळ फुलत होते. मात्र यावेळी भाजपकडून प्रबळ इच्छुक असलेले सुनील शेळके यांना तिकीट नाकारले आणि तिसऱ्यांदा बाळा भेगडे यांना संधी दिली. त्यावेळी सुनील शेळके यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये सामील झाले. विधानसभेचे तिकीट मिळवून राष्ट्रवादी कॉंग्रेसला पहिला आमदार मिळवून दिला. यामध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी शेळके यांच्या प्रचारार्थ सभा घेतली. त्यामुळे सुनील शेळके हे राष्ट्रवादी कॉंग्रेससोबत राहणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
यासंदर्भात आमदार शेळके यांना माध्यमांनी विचारले असता आपण पक्षासोबत राहणार असल्याचे सांगण्यात आले. शपथविधीला मी उपस्थित होतो, परंतु जो काही प्रकार घडत होता, याबाबत आपल्याला पूर्वकल्पना दिली नव्हती, असेही सुनील शेळके यांनी स्पष्ट केले. दरम्यान, सुनील शेळके यांचा विधानसभा निवडणुकीत उमेदवारी जाहीर करण्यापासून ते उमेदवारी अर्ज दाखल करण्यापर्यंत जोरदार शक्तीप्रदर्शन करण्यात आले. त्यावेळी अजित पवार यांचे “सपोर्ट’ महत्त्वाचा होता. याशिवाय उमेदवारी देण्यात अजित पवार यांचे योगदान अधिक असले तरी शरद पवार यांनी प्रचारसभा घेऊन माझ्या विजयात मोलाचा वाटा उचलला, असल्याचेही आमदार शेळके सांगायला विसरले नाहीत.
सुनील शेळके यांना तिकीट मिळाले तरी जिल्ह्यात फक्त त्यांचेच तिकीट शेवटच्या क्षणी जाहीर झाल्याने, काहीशी मानहानी झाल्याची भावना त्यांच्या मनात होती. या पार्श्वभूमीवर शेळके मूळ पक्षाशी म्हणजेच शरद पवार यांच्याशी निष्ठावंत राहण्याची शक्यता अधिक आहे, असे त्यांनी प्रथमदर्शनी स्पष्ट केले आहे.
मुंबई येथील राजभवनात झालेल्या शपथविधीच्या कार्यक्रमास मी हजर होतो, मात्र मला त्यासंदर्भातील पुसटशी कल्पनाही नव्हती. मात्र हळूहळू मी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या तिकीटावर मावळ विधानसभा मतदारसंघातून विजयी झालो आहे. अजित पवार यांनी मला तिकीट दिले. त्यानंतर शरद पवार यांनी माझ्या प्रचारार्थ सभा घेतल्या. त्यामुळे मी राष्ट्रवादी कॉंग्रेससोबत राहणार आहे.
– सुनील शेळके, आमदार, मावळ विधानसभा.