पांचगणी – पांचगणी येथील एका शाळेच्या ड्रेनजे पाणी दिवसा ढवळ्या बिनधिक्कतपणे रस्त्यावर सोडण्याचा प्रकार शुक्रवारी घडला. पांचगणी-राजपुरी रस्त्यावर ड्रेनजचे पाणी सोडल्यामुळे नागरिकांमधून संतप्त प्रतिक्रिया उमटत असून संबंधितांनी या पाण्याचा कायमचा बंदोबस्त करावा अन्यथा तीव्र आंदोलन करावे लागेल, असा इशारादेखील नागरिकांनी दिला आहे.
सविस्तर वृत्त असे, पांचगणीहून राजपुरीकडे जाणाऱ्या रस्त्याला लागूनच खिंगर गावच्या हद्दीत एक निवासी शाळा आहे. या शाळेचे ड्रेनेजचे पाणी खुलेआम रस्त्यावर सोडले जाते. त्यामुळे दुर्गंधीचे साम्राज्य पसरत आहे.
परिणामी रस्त्यावर साचलेले पाणी वाहनांच्या चाकांमुळे पादचाऱ्याच्या अंगावर उडत असल्याने शाळेतील मुले व ये-जा करणाऱ्या नागरिकांना त्याचा त्रास सहन करावा लागत आहे. हा प्रकार सर्रासपणे चालू असून याकडे संबंधित शाळाप्रशासन जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत आहेत. या पाण्याबाबत खिंगर ग्रामस्थ व परिसरातील नागरिकांनी शाळेला बऱ्याचदा विचारणा करून पांचगणी पालिकेला निवेदनही दिले होते. परंतु याचा काहीच उपयोग होत नसून “ये रे माझ्या मागल्या’ अशीच अवस्था आहे.
शाळा व्यवस्थापनाची ही प्रवृत्ती नागरिकांच्या आरोग्यावर घाला घालणारी असून याबाबत राजपुरी, खिंगर, गोडवली, आंब्रळ ग्रामस्थ संतप्त झाले असून जर शाळेने पाण्याचा कायमचा बंदोबस्त केला नाही तर मात्र आम्हाला तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडावे लागेल असा इशारा दिला आहे.
या पाण्याबाबत ग्रामपंचायतीने शाळेला लेखी पत्र देऊनही सुधारणा केली नाही. त्यामुळे आता तरी शाळेने आपल्या पाण्याची कायमची सोय करावी अन्यथा प्रदूषण नियंत्रण मंडळाला याबाबत लेखी निवेदन देण्यात येणार असून प्रसंगी रस्त्यावर बसून सर्व ग्रामस्थ रस्तारोको आंदोलन करतील.
अशोक दुधार्णें, उपसरपंच खिंगर ग्रामपंचायत.