केंद्रीय रसायन राज्यमंत्र्यांसोबत दिल्लीत झाली बैठक
पिंपरी – पिंपरीतील हिंदुस्थान ऍन्टीबायोटिक्स कंपनीला उभारी देण्यासाठी केंद्र सरकारने जाहीर केलेल्या 280.17 कोटी रुपयांच्या पॅकेजची रक्कम प्राधान्याने मिळावी, या मागणीसह अन्य प्रलंबित मागण्यांबाबत केंद्रीय रसायन राज्यमंत्री मनसुख मांडविया यांच्या समवेत मंगळवारी (दि. 19) हिंदुस्थान ऍन्टीबायोटिक्स मजदूर संघाच्या पदाधिकाऱ्यांची सकारात्मक चर्चा झाली. केंद्रीय रसायन मंत्र्यासोबत बैठक नियोजित होती, परंतु ते उपस्थित नसल्याने मजदूर संघाच्या पदाधिकाऱ्यांनी राज्यमंत्र्यांसोबत चर्चा केली.
नवी दिल्ली येथे याबाबत झालेल्या बैठकीत मांडविया यांनी एच.ए.च्या प्रश्नांबाबत लक्ष घालण्याचे आश्वासन दिले. तसेच, याबाबत बैठक घेऊन तातडीने मार्ग काढण्यात येईल, असेही स्पष्ट केले. बैठकीला एच.ए. मजदूर संघाचे अध्यक्ष मनोज कोटक, सरचिटणीस सुनील पाटसकर, उपाध्यक्ष विजय पाटील, खजिनदार राजेंद्र जाधव, सामाजिक कार्यकर्ते मदन दिवाण आदी उपस्थित होते. केंद्रीय रसायनमंत्री सदानंद गौडा यांच्यासोबत मात्र याबाबत चर्चा होऊ शकली नाही.
एच.ए. कारखान्याच्या पुर्ननिर्माणासाठी केंद्र सरकारने यापूर्वी 821.17 कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर केले होते. त्यामध्ये प्रामुख्याने कामगारांना थकित पगार, ग्रॅच्युएटी, भविष्य निर्वाह निधी, वेतन फरकाची रक्कम आदींचा समावेश आहे. त्यातील 100 कोटी रुपये यापूर्वी देण्यात आले आहेत. कामगारांचा 27 महिन्यांचा थकीत पगार आणि स्वेच्छानिवृत्ती रक्कम आदींसाठी 280.17 कोटी रुपयांची रक्कम देण्याचे केंद्र सरकारने यापूर्वी जाहीर केलेली आहे. मात्र, अद्याप ही रक्कम मिळालेली नाही. त्याबाबत बैठकीत सविस्तर चर्चा झाली. ही रक्कम एच.ए. कारखान्याला लवकरात लवकर मिळावी, यासाठी लक्ष घालणार असल्याचे मांडविया यांनी नमूद केले.
लवकरच स्वतंत्र बैठक
कंपनीतील सुमारे 450 कामगारांनी स्वेच्छानिवृत्तीसाठी अर्ज भरले आहेत. संबंधित कामगारांनी स्वेच्छानिवृत्ती घेतल्यानंतर कंपनी कशा पद्धतीने चालविता येईल, कंपनीमध्ये स्ट्रॅटेजिक सेल झाल्यानंतर काय होईल किंवा स्ट्रॅटेजिक सेलशिवाय अन्य काही पर्याय आहेत का, याबाबत एच.ए.मजदूर संघाकडून बैठकीत माहिती देण्यात आली. तसेच, कंपनीच्या उत्पादन प्रक्रियेला गती देण्यासाठी अत्याधुनिक यंत्रसामग्री लागणार असल्याचे नमूद करण्यात आले. मांडविया यांनी याबाबत लवकरच स्वतंत्र बैठक घेऊन तोडगा काढण्याचे आश्वासन दिले.