शंकर दुपारगुडे
उत्पादन शुल्क विभागाची निवडणूक काळात धडक कारवाई
कोपरगाव – महाराष्ट्र शासन राज्य उत्पादन शुल्क कोपरगाव विभागाने विधानसभा निवडणुकीदरम्यान अवैध दारू विक्री करणाऱ्यांवर धडक कारवाई करून सप्टेंबर आणि ऑक्टोबर 2019 या दोन महिन्यांमध्ये तब्बल बारा लाख 16 हजार 270 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. यामध्ये देशी-विदेशी दारूसह मोटरसायकली, जीप, रिक्षा आदी वाहनांसह इतर मुद्देमाल जप्त केली. तसेच 29 जणांवर गुन्हे दाखल आले.
विधानसभा निवडणुकीच्या काळात कोपरगाव मतदारसंघ आणि इतर परिसरामध्ये बेकायदेशीर दारू विक्री मोठ्या प्रमाणात सुरू होती. त्यास आळा बसावा, यासाठी उत्पादन शुल्क विभागाने धडक कारवाई करत अनेक जणांवर गुन्हे दाखल केले आहेत. सप्टेंबर महिन्यामध्ये 14 गुन्ह्यांची नोंद करण्यात आली, तर ऑक्टोबरमध्ये 25 गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे.
सप्टेंबरमध्ये 57 हजार 300 रुपयांचा मुद्देमाल, तर ऑक्टोबरमध्ये 11 लाख 58 हजार 970 रुपयांचा मुद्देमाल राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने कारवाई केली. राज्य उत्पादन शुल्क कोपरगाव विभागाकडे कर्मचाऱ्यांची संख्या कमी असली, तरी कारवाई मात्र जोरात केल्याने हा चर्चेचा विषय आहे. कारवाईसाठी स्वतःची गाडी सुद्धा नाही. असे असतानाही ही कारवाई करण्यात आलेली आहे. कोपरगाव विभागाचे कार्यक्षेत्र मोठे आहे.
या कार्यक्षेत्रामध्ये कोपरगाव शहर आणि ग्रामीण पोलीस ठाणे हद्द शिर्डी, राहाता, लोणी, राहुरी, शिंगणापूर, सोनई व नेवासा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अर्धाभाग या कार्यक्षेत्रामध्ये येतो. या कार्यालयाकडे एक निरीक्षक, दोन भूजम निरीक्षक, तीन जवान आणि एक चालक, इतका अपुरा कर्मचारी वर्ग आहे. तरीही या विभागाने धडक कारवाई केला. कार्यालयाची स्वतःची इमारत नाही. वाहन नाही. कर्मचारीही कमी, अशाही परिस्थितीत या कार्यालयाकडून धडक कारवाई करण्यात आली.
भविष्यात बेकायदा दारू विक्री करणारे, बेकायदा बिअरबार चालवणारे देशी-विदेशी दारूवरती आपला वचक निर्माण करण्याचे काम हा विभाग सक्षमपणे करेल. मात्र त्यासाठी त्यांना स्वतःच्या हक्काच्या किमान एका वाहनाची आणि कार्यालयाची नितांत गरज आहे. तरच काळाबाजार आणि दारूची विक्री होणारी बंद होईल, यावरती आळा बसवण्यासाठी हे विभाग सक्षम पणे काम करू शकेल. याठिकाणी कर्मचाऱ्यांचा अभाव असल्याने बेकायदा दारू विक्रेत्यांना अधिक बळ मिळत आहे. आगामी काळातही ही कारवाई सुरूच राहील, अशी माहिती कोपरगाव विभागाचे निरीक्षक भैयासाहेब घोरतळे यांनी दिली आहे.