सत्ताधारी पुरोगामी सहकारला 17, तर विरोधी परिवर्तन पॅनेलला 4 जागा
नगर – माध्यमिक शिक्षकांची कामधूेन असणाऱ्या माध्यमिक शिक्षक सोसायटीच्या निवडणुकीमध्ये प्रा.भाऊसाहेब कचरे यांच्या नेतृत्वाखालील पुरोगामी सहकार मंडळाने चौथ्यांदा निर्विवाद वर्चस्व गाजवताना 21 पेैकी 17 जागा जिंकल्या. विरोधी परिवर्तन मंडळाला चार जागांवर समाधान मानावे लागले.तर, तिसऱ्या जनेसवा आघाडीच्या एकाही उमेदवाराला चार आकडी मतांचा आकडा गाठता आला नाही. मागील वेळी विरोधी परिवर्तनला पाच जागा मिळाल्या होत्या. यावेळी त्यात एका जागेची घट झाली.
पुरोगामी मंडळ, परिवर्तन मंडळ व जनसेवा यांच्यात लढत झाली. 21 जागांसाठी 64 उमेदवार रिंगणात होते. या निवडणुकीमध्ये पुन्हा पुरोगामी मंडळाने आपले वर्चस्व मिळविलेले आहे. पुरोगामीला 17 तर परिवर्तन मंडळाला चार जागा मिळालेल्या आहेत. जनसेवा मंडळाला एकही जागा मिळालेले नाही.
माध्यमिक शिक्षक सोसायटीच्या 21 जागांसाठी 64 उमेदवार निवडणुकीच्या आखाड्यात उतरलेले होते.
रविवारी मतदान प्रक्रिया सुरळीत पार पडली. यामध्ये 10 हजार 233 पैकी नऊ हजार 229 मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. शहरातील ओमगार्ड येथे आज सोमवारी सकाळी मतमोजणी प्रक्रिया पार पडली. मतमोजणी असल्यामुळे उमेदवार व नेत्यांनी मतदान केंद्राच्या परिसरात सकाळी पावणे आठलाच हजेरी लावली होती. सकाळी आठ वाजता मतमोजणीस सर्वसाधारण मतदार संघापासून सुरवात झाली. त्यानंतर महिला राखीव, इतर मागास प्रवर्ग, अनुसूचित जाती-जमाती व शेवटी विशेष मागास प्रवर्गाची मतमोजणी झाली.
या निवडणुकीमध्ये सर्वसाधारण मतदार संघातून परिवर्तन मंडळाचे अप्पासाहेब शिंदे, व नानासाहेब बोडखे, इतर मागास प्रवर्गातून महेंद्र हिंगे, तसेच भटक्या विमुक्त प्रवर्ग मतदार संघातून वसंत अमृत खेडकर विजयी झालेले आहेत. पुरोगामी मंडळाचे भाऊसाहेब कचरे यांच्यासह 17 जण विजयी झालेले आहेत. उमेदवारांच्या प्रतिनिधींना मतमोजणीच्या वेळी जेवणाची व्यवस्था निवडणूक विभागाकडून करण्यात आलेली नव्हती. त्यामुळे काहींनी प्रशासनाच्या कारभारावर नाराजी व्यक्त करून जेवणाची व्यवस्था करायला हवी होती, अशी खंत निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे व्यक्त केली. निवडणूक अधिकारी म्हणून किसन रत्नाळे यांनी काम पाहिले. त्यांना जिल्हा उपनिबंधक दिग्विजय आहेर यांनी मार्गदर्शन केले.
… अंगठी परत
नगर शहरातील मतदान केंद्रावर कॅन्व्हेंट स्कूलच्या शिक्षिका स्मिता क्षेत्रे यांची अंगठी गडबडीत मतपेटीत मतदान करताना पडली. मतपेटी मध्ये उघडता येत नसल्याने सदर अंगठी दुसऱ्या दिवशी मतमोजणीच्यावेळी मतमोजणी केंद्राध्यक्ष ज्योती हराळे यांना मिळाली. ती त्यांनी निवडणूक अधिकारी के.आर.रत्नाळे यांच्याकडे सोपविली. परिवर्तनचे उमेदवार व नेते नानासाहेब बोडखे यांच्याकडे ही अंगठी निवडणूक अधिकाऱ्यांनी दिली. क्षेत्रे यांनी तसे पत्र दिले होते. या प्रामाणिकपणाबद्दल हराळे यांचे सर्वांनी कौतुक केले.
मतमोजणी सहापर्यंत आटोपली
मागील दोन-तीन निवडणुकांत मतमोजणीला रात्रीचे अकरा वाजत होते. हा अनुभव लक्षात घेता निवडणूक अधिकाऱ्यांनी यावेळी 12 ऐवजी 30 टेबल व 250 कर्मचारी ठेवले होते. त्यामुळे सर्वसाधारणची मतमोजणी दुपारी दोनपर्यंतच संपली.त्यांनतर इतर जागांची मतमोजणी झाली. मात्र, सर्व निकाल संध्याकाळी सहाच्या दरम्यान एकाच वेळी जाहीर करण्यात आले.