नगर – अतिक्रमण विरोधी कारवाई करत असलेल्या महापालिकेच्या ट्रकलाच नियमांची पायमल्ली करत असल्याचे आढळून आल्याने उपप्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांनी ट्रकला सहा हजार 700 रुपयांचा दंड केला. दंड न भरल्याने वाहन जप्त केले. तर आम्हाला कोणतेही कागदपत्रे न मागता वाहन जप्त करण्याचे आदेश आहे असे सांगत वाहन जप्त करण्यात आल्याचे महापालिका प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे.
महापालिकेच्या अतिक्रमण निर्मुलन विभागाने आज सकाळी अतिक्रमण निर्मुलनाची मोहीम हाती घेतली होती. या मोहिमेत एक जेसीबी, एक ट्रक व सुमारे 10 कर्मचारी सहभागी झाले होते. सकाळी या पथकाने नगर- सोलापूर रस्त्यावरील शांतिनगर येथील रिकाम्या भूखंडावरील एक पक्के अतिक्रमण जमीनदोस्त केले. त्यानंतर हे पथक सावेडीतील तोफखाना पोलीस ठाणे ते भिस्तबाग रस्त्यावरील अतिक्रमणे काढण्यासाठी निघाले.
पथक मिस्किन मळ्याजवळ आले असता उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयाकडून पथकातील ट्रकला अडविण्यात आले. ट्रक चालकाला वाहन उपप्रादेशिक परिवहन कार्यालय (आरटीओ) येथे लावण्यास सांगण्यात आले. पथकातील काही कर्मचाऱ्यांनी महापालिकेतील अतिक्रमण विरोधी पथकाचे प्रमुख सुरेश इथापे यांना दुरध्वनीवरून संपर्क केला. इथापे यांनी आरटीओतील अधिकाऱ्यांशी चर्चा केली. महापालिकेकडून हे वाहन शासकीय असल्याचे सांगण्यात आले. मात्र या वाहनाचे अनेक वर्षांपासून योग्यता प्रमाणपत्र (फिटनेस) व विमा नसल्याचे आढळले असे आरटीओ कार्यालयाकडून स्पष्ट करण्यात आले.