पोलिसांचे दुर्लक्ष : वसुली पंटरकडून कर्जदारांचे “ब्लॅकमेलिंग’
पिंपरी – पिंपरी-चिंचवड शहरात खासगी सावकारी सध्या जोमात सुरू असून, मनमानी पद्धतीने व्याज आकारणी केली जात आहे. कर्जाच्या वसुलीसाठी घरात घसून महिलेचा विनयभंग करणे, कुटूंबाचे अपहरण करणे, तसेच कोणतीही पूर्वसूचना न देता मालमत्ता जबरदस्तीने ताब्यात घेणे हे प्रकार यापूर्वीच शहरात घडले आहेत. मात्र या खासगी सावकारीकडे पोलिसांनी दुर्लक्ष केल्याने वसुली पंटरकडून कर्जदारांची छळवणूक होताना दिसते.
पिंपरी चिंचवड शहर कामगारनगरी म्हणून ओळखली जाते. शहरात उदरनिर्वाहासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून आलेला मजूरवर्ग मोठ्या प्रमाणात वास्तव्यास आहे. अनेकांच्या हाताला नियमित काम मिळत नाही. यामुळे कामगार, बेरोजगार तरुण, छोटे व्यावसायिक, रिक्षाचालक हे या खासगी सावकारीच्या विळख्यात सापडल्याचे धक्कादायक वास्तव सध्या शहरात अनुभवायास मिळत आहे.
अबब… 20 टक्के व्याज आकारणी?
फायनान्स कंपनीच्या नावाखाली अनेकांनी खासगी सावकारांनी दुकाने थाटली आहेत. या सावकरांचे एजंट आर्थिक कोंडीत सापडलेले सावज शोधण्यासाठी शहरात दिवसभर घिरट्या घालत असतात. सावज मिळताच आपण मदत करत असल्याचे सोंग घेऊन 10 ते 20 हजारांपर्यंत पैसे दिले जातात. त्यावर 10 ते 20 टक्क्यांपर्यंत मासिक व्याज मनमानी पद्धतीने आकारून एक प्रकारे पिळवणूकच केली जाते.
वसुलीसाठी काहीपण…
कर्जाच्या वसुलीसाठी कर्नाटकमधील विजापूरहून आलेल्या सात जणांनी वाकडमधून एका कुटूंबाचे अपहरण केले. 50 हजार रुपये घेतलेले असतानाही खासगी सावकाराच्या पंटरांनी एक लाख 80 हजार रुपये घेतल्याचे स्टॅम्प पेपरवर जबरदस्तीने लिहून घेतले. तर पतीने घेतलेल्या कर्जाच्या वसूल करण्यासाठी वसुली एजंट थेट घरात घुसला व महिलेचा विनयभंग केला. तर निगडीमध्ये एका फायनान्स कंपनीने कोणतीही पूर्वसूचना न देता मालमत्ता जबरदस्तीने ताब्यात घेतल्याचाही गुन्हा दाखल निगडी पोलीस ठाण्यात दाखल आहे.
दैनंदिन वसूली कार्ड
एखाद्यास 10 हजार हवे असल्यास सुरुवातीला एक हजार रुपये अगोदरच कापून घेतले जातात. उर्वरित नऊ हजारांसाठी 50 दिवसांचे एक कार्ड तयार केले जाते. दररोज एक ठिकाण व वेळ ठरवून 250 रुपये जमा करुन घेतले जातात. पैसे जमा केल्यानंतर कार्डवर नोंद केली जाते. 50 दिवस 250 रुपयांचा भरणा केला असता 50 दिवसांत 12 हजार 500 रुपये जमा होतात. 50 दिवसांत तीन हजार 500 रुपये केवळ व्याजापोटी आकारले जातात.
गरीब घाबरतो आपल्या इज्जतीला
सावकरांनी ठरवून दिलेल्या वेळेत पैसे दिले नाही, तर लगेच वसुली पंटरचे फोन सुरु होतात. वसुलीसाठी गुन्हेगारी पार्श्वभूमीचे पंटर असल्यामुळे गोरगरीब नागरिक दबावापोटी पोटाला चिमटा काढून पैसे भरतात. व्याज देण्यास थोडी जरी दिरंगाई झाली, तर हे वसुली पंटर घरी जाऊन मोठ्याने शिवीगाळ करतात. प्रसंगी मारहाण केल्याच्या घटना देखील घडल्या आहेत. मात्र, गरीब आपल्या इज्जतीला घाबरत असल्याने पंटरांच्या दहशतीपोटी कोणीही तक्रार देत नाहीत. त्यामुळे पोलिसही याकडे जाणीवपूर्वक कानाडोळा करत असल्याचे चित्र आहे. काही वसुली पंटर हातात पेन आणि डायरी घेऊन काळेवाडीतील धनगरबाबा मंदिर चौक, एमएम शाळेसमोर, पिंपरीतील इंदिरा गांधी उड्डाण पूल, शगुन चौक, भोसरीतील लांडेवाडी चौक, थेरगाव येथील काळेवाडी फाटा, चिंचवड येथील चाफेकर चौक येथील मजूर अड्ड्यावर थांबल्याचे दिसतात.
असा आहे सावकारी विरोधात कायदा
परवाना धारकांनी नमूद पत्त्याव्यतिरिक्त किंवा कार्यक्षेत्राबाहेर सावकारी व्यवसाय करणे, दुसऱ्याच्या नावावर सावकारी करणे, या बाबी आढळल्यास कलम 41 अन्वये पहिल्यांदा गुन्हा केल्यास एक वर्षापर्यंत कैद किंवा 15 हजार रुपयांपर्यंत दंड किंवा दोन्ही प्रकारची शिक्षा होऊ शकते. हाच गुन्हा दुसऱ्यांदा किंवा त्यानंतर केल्यास पाच वर्षांपर्यंत कैद आणि 50 हजारांपर्यंत दंड अशी शिक्षा होऊ शकते. कोरी वचनचिठ्ठी, बंधपत्र किंवा इतर प्रकारची कागदपत्रे घेतल्याचे निदर्शनास आल्यास तीन वर्षांपर्यंत कैद किंवा 25 हजार दंड यापैकी एक किंवा दोन्ही शिक्षेची तरतूद कायद्यात केली आहे.