‘राज ठाकरेंनी सक्षम विरोधी पक्षाची गरज काय बोलून दाखवली, तर…’

मुंबई – मुख्यमंत्रीपदावरून मित्रपक्ष शिवसेनेशी मतभेद आणि मनभेद झाल्यानंतर संख्याबळाअभावी भाजपने महाराष्ट्रात सत्ता स्थापनेवरून अखेर माघार घेतली. त्याचवेळी सरकार स्थापन करण्यासाठी शिवसेनेला भाजपने शुभेच्छा दिल्या. भाजपच्या या भूमिकेमुळे सत्तासंघर्षाला नाट्यमय वळण लागले असून महाराष्ट्राचे भवितव्य आता शिवसेनेच्या हाती आहे. त्यामुळे शिवसेना सरकार स्थापन करणार का, असा प्रश्न उपस्थित झाला असून शिवसेनेला सरकार स्थापन करण्यासाठी कॉंग्रेस व राष्ट्रवादी कोणती भूमिका घेणार याकडे अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे. दरम्यान, भाजपने सरकार स्थापन करणार नसल्याचे स्पष्ट करताच राज्यात राजकिय घडामोडींना वेग आला आहे.

या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या अधिकृत फेसबुक पेजवरुन सर्वपक्षीयांना मार्मिक टोला लगावला आहे. विधानसभेच्या प्रचारादरम्यान मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ‘एक सक्षम विरोधीपक्ष म्हणून माझ्या उमेदवारांना निवडून द्या. ते तुमचे प्रश्न सत्ताधाऱ्यांसमोर अधिक सक्षमपणे मांडतील’ अशी भूमिका घेतली होती. यानुसार सध्याच्या परिस्थितीवर भाष्य करताना मनसे फेसबुक पेजवर एक पोस्ट शेअर केली आहे. यामध्ये “राज ठाकरे यांनी एक सक्षम विरोधी पक्षाची गरज काय बोलून दाखवली, आता तर सगळेच पक्ष विरोधात बसण्यात तयार झाले आहेत,” असा टोला मनसेने लगावला आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here