मिडगुलवाडी येथील घटना : पती फरार
शिक्रापूर – मिडगुलवाडी (ता. शिरूर) येथील एका पोल्ट्रीवर काम करणाऱ्या दाम्पत्यातील पतीने कोणत्यातरी अज्ञात कारणातून पत्नीचा खून करून घराला बाहेरून कडी लावून पळ काढला. याप्रकरणी पोल्ट्री मालक अमोल मिडगुले (रा. मिडगुलवाडी, ता. शिरूर) यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली आहे. पोलिसांनी महिलेचा पती प्रेमसिंग देवराम पटेल (रा. पानंद, जि. खंडाळा) यांच्याविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे.
मिडगुलवाडी येथील अमोल मिडगुले यांनी त्यांच्या पोल्ट्री फार्मवर कामासाठी दीड महिन्यापूर्वी खंडाळा येथील एक दाम्पत्य ठेवले होते. आज सकाळी अमोल हे त्यांच्या शेतातील पोल्ट्रीवर गेले असताना त्यांना ज्या खोलीत प्रेमसिंग पटेल व माया पटेल हे राहत होते. त्या खोलीला बाहेरून कुलूप दिसले. त्यामुळे कामाला ठेवलेले दाम्पत्य पळून गेले की काय, अशी शंका आल्याने अमोल यांनी खिडकीतून आतमध्ये पाहिले असताना त्यांना आतमध्ये माया पटेल निपचित पडलेली दिसली. त्यांनी पोलीस पाटील राजेंद्र पिंगळे यांना माहिती दिली.
पिंगळे यांनी येऊन पाहणी करून पोलिसांना माहिती दिली. पोलीस निरीक्षक सदाशिव शेलार, सहायक पोलीस निरीक्षक विक्रम साळुंके, सहायक पोलीस उपनिरीक्षक मधुकर खिलारे, महेंद्र शिंदे, पोलीस शिपाई भास्कर बुधवंत, हेमंत इनामे यांनी घटनास्थळी पाहणी केली. माया पटेल हिचा खून झाल्याचे आढळले. चौकशी केली असता प्रेमसिंग पटेल व माया पटेल यांच्यामध्ये रात्रीच्या सुमारास भांडणे सुरू होती. त्या वादातून प्रेमसिंगने पत्नीचा गळा आवळून अथवा भिंतीवर डोके आपटून खून केल्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे.