बच्चन जस्ट डायलचे ब्रॅंड ऍम्बेसिडर असल्याने केले प्रतिवादी
वकिलांची जाहिरातबाजी केल्याचे प्रकरण
पुणे – ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन आणि “जस्ट डायल’ कंपनीविरोधात वकिलांची जाहिरात केल्याप्रकरणी येथील दिवाणी न्यायालयात दावा दाखल केला आहे. वकिलांची जाहिरातबाजी करण्यास कंपनीला मनाई करावी, अशी मागणी या याचिकेद्वारे करण्यात आली आहे. या प्रकरणाची सुनावणी 11 नोव्हेंबर रोजी होणार आहे.
येथील वकील वाजेद खान यांनी हा दावा दाखल केला आहे. जाहिरात केल्यास वकिलांवर कारवाई करण्यात येईल, असा इशारा बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवाकडून नुकताच देण्यात आला आहे. बार कौन्सिलच्या नियम 36 प्रमाणे वकिलांना स्वतःची जाहिरात करण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे.
“जस्ट डायल’ या दूरध्वनी क्रमांकावरून वकील पुरविण्याचे काम करीत आहे. अर्जदारांची परवानगी न घेता त्यांचे नाव जस्ट डायलने फ्री लिस्टिंगमध्ये टाकले आहे. लिस्टमध्ये नाव येण्यासाठी 24 हजार रुपये शुल्क आकारण्यात येत आहे. पैसे देणाऱ्या वकिलांची नावे यादीत वर येत आहे. त्यामुळे वकिलांमध्ये टॉपटेनची घाणेरडी स्पर्धा निर्माण झाली आहे. प्रतिवादी हे प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षरित्या जाहिरात करून वकिलांना पैसे मिळवून देत आहे, असे या याचिकेत नमूद केले आहे.
जस्ट डायलला वकिलांची आणि तक्रारदारांची जाहिरात करण्यात बंदी घालावी आणि प्रतिवाद्यांना न्यायालयात हजर राहण्यासंदर्भात आदेश करावेत, अशी मागणी याचिकेद्वारे केली आहे. बच्चन हे जस्ट डायलचे ब्रॅंड ऍम्बेसिडर आहेत. त्यामुळे त्यांना देखील प्रतिवादी करण्यात आल्याचे ऍड. खान यांनी सांगितले.