मुंबई – विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी संपल्यानंतर आता राज्यातील सत्तास्थापनेच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्रीपदावरून भाजपा व शिवसेना या मित्रपक्षात चढाओढ सुरू झाल्याचे दिसत आहे. या पार्श्वभूमीवरच देवेंद्र फडणवीस हेदेखील स्वत:ला शिवसैनिकच समजतात. त्यामुळे मुख्यमंत्रिपद शिवसेनेलाच दिल्यासारखे असल्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी म्हंटले आहे.
सुधीर मुनगंटीवार म्हणाले कि, शिवसेनेची मुख्यमंत्रिपदाची मागणी हेच तिढ्याचे मुख्य कारण आहे. देवेंद्र फडणवीस हेदेखील स्वत:ला शिवसैनिकच समजतात. त्यामुळे मुख्यमंत्रिपद शिवसेनेलाच दिल्यासारखे असल्याचे त्यांनी सांगितले.
गृहमंत्री आणि भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांच्या दौऱ्याची तारीख अद्याप निश्चित नाही. सध्या राज्यपातळीवर हा प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केला जाईल. आवश्यकता असल्यास राष्ट्रीय पातळीवर याची चर्चा केली जाईल, असेही त्यांनी सांगितले.
दरम्यान, भाजप-शिवसेनेचा सत्तस्थापनेचा फॉर्म्युला अद्याप निश्चित झाला नसला तरीही दोन्ही पक्ष स्वतंत्रपणे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या भेटीगाठी करत आहेत. यामुळे अनेक तर्कवितर्कांना उधाण आले होते. या पार्श्वभूमीवर भाजपाचे चाणक्य अमित शहा हे लवकरच उध्दव ठाकरे यांची भेट घेणार आहेत. त्यावेळी शिवसेना नमते घेणार की शहांच्या बोलण्याला मान देणार याबाबत औत्सुक्य आहे.