पुणे – विधानसभा निवडणुकीत विरोधी पक्षाच्या उमेदवाराच्या प्रचाराच्या पोस्ट फेसबुक आणि विविध सामाजिक माध्यमांवर टाकल्याच्या रागातून एकावर खुनी हल्ला करणाऱ्या आठ कार्यकर्त्यांना कोंढवा पोलिसांनी अटक केली आहे. त्या आठ जणांना 3 नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश न्यायालयाने दिला आहे.
अक्षय अशोक लोणकर (वय 27), कुणाल तानाजी लोणकर (वय 23), कुणाल ऊर्फ ऋषिकेश देवानंद लोणकर (वय 25), स्वप्नील ऊर्फ बाळा ज्ञानेश्वर लोणकर (वय 23), प्रवीण ज्ञानेश्वर लोणकर (वय 30), कुणाल प्रताप लोणकर (वय 21), प्रज्वल तुकाराम लोणकर (वय 22), श्लोक मच्छींद्र शेटे (वय21 सर्व रा. कोंढवा खुर्द) अशी त्या आठ जणांची नावे आहेत. इतर पाच जणांवर गुन्हा दाखल आहे. सुमित विजय बाबर (32, रा. मारुती आळी, कोंढवा खुर्द) यांच्यावरील खुनी हल्ल्याप्रकरणी त्यांनी कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. हा प्रकार कोंढवा खुर्द परिसरातील बुधवारी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास घडला. या गुन्ह्याचा तपास पोलीस अधिकारी एस. ए. पाटील करीत आहेत.
प्रतिस्पर्धी उमेदवाराची पोस्ट करीत होता शेअर
याबाबत तपास अधिकारी सहायक पोलीस निरीक्षक एस. ए. पाटील यांनी सांगितले, फिर्यादी सुमित बाबर आणि प्रतिवादी संशयित आरोपी हे एकाच पक्षाचे कार्यकर्ते आहेत. नुकताच झालेल्या विधानसभा निवडणुकीच्या काळात सुमित बाबर प्रतिस्पर्धी असलेल्या उमेदवाराच्या पोस्ट फेसबुकवर शेअर करत होता. याच रागातून संशयित आरोपींनी संगनमत करून बेकायदेशीर जमाव जमवून सुमित यांच्यावर जेवघेणा हल्ला केला होता.