जुने दिवे बदलणार : शासनाने निश्चित केलेल्या कंपनीकडून खरेदी
पिंपरी – शहरातील जुने दिवे बदलून त्याठिकाणी 34 कोटी 29 लाख रूपयांचे नवीन एलईडी दिवे बसविण्यात येणार आहेत. एनर्जी इफीसिएन्सी सर्व्हिसेस लिमिटेड (ईईएसएल) या कंपनीला हे काम देण्यात आले आहे. एलईडी दिव्यांच्या झगमगाटावर महापालिकेची कोटी कोटी उड्डाणे सुरू असल्याने करदाते तोंडात बोटे घालत आहेत.
राज्य सरकारच्या उर्जा संवर्धन धोरणानुसार उर्जा संवर्धन व वाढ करणे तसेच त्याची अंमलबजावणी करण्यासाठी सरकारने 12 जानेवारी आणि 4 जून 2018 रोजी काही महत्त्वपूर्ण निर्णय घेतले. “एस्को’ तत्त्वावर स्थानिक स्वराज्य संस्थांनी पथदिव्यांकरिता फक्त एलईडी पथदिवे बसविणे बंधनकारक केले. त्या अनुषंगाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या क्षेत्रात केंद्र सरकारचा सार्वजनिक उपक्रम असलेल्या एनर्जी एफिशियन्सी सर्व्हिसेस (ईईएसएल) यांच्या माध्यमातून एस्को तत्त्वावर एलईडी पथदिवे बसविण्यासाठी राज्य सरकारने “ईईएसएल’समवेत करारनामा केला आहे.
पिंपरी – चिंचवड शहरातील रस्त्यांवर जुने दिवे बदलण्याच्या कामास सरकारने अधिकृत केलेल्या “ईईएसएल’ या संस्थेसमवेत करारनामा करण्यास आणि त्यांच्याकडून संयुक्तिक पाहणीनंतर अंतिम अहवालानुसार काम करवून घेण्यास महापालिका सभेने 7 सप्टेंबर 2019 रोजी मान्यता दिली आहे.
“ईईएसएल’ कंपनीने सुधारित प्रस्तावानुसार, प्रकल्प खर्चाची रक्कम अंदाजे 34 कोटी 29 लाख रूपये अधिक वस्तू व सेवा कर अशी सादर केली आहे. एकूण प्रकल्प खर्चापैकी तीन महिन्यांची आगाऊ रक्कम महापालिकेला जमा करावी लागणार आहे. वीज बचतीसाठी एलईडी दिवे बसविण्याचे धोरण महापालिकेने स्वीकारले आहे. मात्र, दिवे बसविणे आणि त्यांची दुरुस्ती यावर होणारा खर्च पाहता हे धोरण महापालिकेसाठी तोट्याचे ठरत असल्याने करदाते नाराजी व्यक्त करीत आहेत.