अभिनेता प्रथमेश परबने नुकतेच आपल्या आगामी चित्रपटाचे टाइटल पोस्टर सोशल मीडियावरून रिव्हील केले आहे. झेब्रा एंटरटेन्मेंटच्या ‘टल्ली’ ह्या 2020 ला रिलीज होणा-या सिनेमात प्रथमेश परब मुख्य भुमिकेत झळकणार आहे. चित्रपटाच्या नावामूळे सध्या ह्या सिनेमा विषयीची उत्सुकता वाढली आहे.
या चित्रपटाची निर्मिती संजय गोळपकर यांनी केली आहे. टल्ली मधून संगीत दिग्दर्शक गणेश-सुरेश दिग्दर्शनात पहिलं पाऊल ठेवतायत. झेब्रा एंटरटेन्मेंट निर्मित गणेश-सुरेश दिग्दर्शित टल्ली सिनेमात प्रथमेश परब मुख्य भूमिकेत असून सिनेमाच्या इतर कलाकारांविषयीची लवकरच घोषणा होईल, हा विनोदी चित्रपट 2020 मध्ये रिलीज करण्याचा निर्मात्यांचा मानस आहे.
अभिनेता प्रथमेश परब म्हणतो, “माझ्या आजवरच्या विनोदी भूमिकांना आणि चित्रपटांना महाराष्ट्राच्या रसिक प्रेक्षकांनी उत्तम प्रतिसाद दिला. टल्ली सिनेमा जरी विनोदी असला, तरीही ह्या सिनेमात विनोदाला समाज प्रबोधनाची झालर आहे. ह्या सिनेमात पहिल्यांदाच माझी ओळख करून देताना नावाअगोदर ‘in & as’ प्रथमेश परब असे दिसेल. कोणत्याही अभिनेत्याच्या कारकिर्दीत अशी ओळख होणे, ही मानाची गोष्ट असते. ह्या सिनेमात माझा लूकही वेगळा असणार आहे. सिनेमासाठी माझं फिजीकल ट्रेनिंगही लवकरच सुरू होईल.”