भाजपला केवळ दौंडची एक जागा
जिल्ह्यात कॉंग्रेस-राष्ट्रवादीचे वर्चस्व
सात मतदार संघांत राष्ट्रवादी, दोन ठिकाणी कॉंग्रेस विजयी
पुणे – जिल्ह्यातील ग्रामीण विधानसभा मतदार संघातील दहा पैकी आठ जागांवर कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसने विजय मिळवत जिल्ह्यावर एकहाती सत्ता प्रस्थापित केली आहे. महायुतीला केवळ दौंडची जागा मिळाली आहे.
पुणे जिल्ह्यातील भोरमध्ये कॉंग्रेसचे संग्राम थोपटे आणि पुरंदरमध्ये कॉंग्रेसचे संजय जगताप निवडून आले आहेत. पुरंदरमध्ये संजय जगताप यांनी शिवसेनेचे उमेदवार राज्यमंत्री विजय शिवतारे यांचा पराभव केला आहे. बारामती मतदारसंघात राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते तथा माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्यात “रेकॉर्ड ब्रेक’ मतं मिळवीत सलग सातव्यांदा विजय मिळवला. तर, लगतच्या इंदापुरातही राष्ट्रवादीचे उमेदवार दत्तात्रय भरणे यांनी भाजपचे उमेदवार माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांचा मोठ्या मताधिक्याने सुपडसाफ केला. दौंड मतदारसंघात भाजपचे उमेदवार राहुल कुल हे केवळ 675 मतांनी विजयी झाले, येथेही राष्ट्रवादीचे उमेदवार रमेश थोरात यांनी कुल यांना अतिशय अटीतटीची लढत दिली. येथील निकाल शेवटच्या फेरीत स्पष्ट झाला.
शिरूर मतदारसंघ राष्ट्रवादीने पुन्हा काबीज केला. येथे भाजपचे विद्यमान आमदार बाबुराव पाचर्णे यांचा पराभव राष्ट्रवादीचे अशोक पवार यांनी मोठ्या मताधिक्याने केला. आंबेगाव मतदारसंघातून राष्ट्रवादीचे नेते दिलीप वळसे पाटील सलग सातव्यांदा निवडून आले. ही निवडणूक वळसे पाटील यांनी एकतर्फी जिंकली. खेडमध्ये राष्ट्रवादीचे दिलीप मोहिते विजयी झाले. मोहिते यांनी मोठ्या मताधिक्याने विद्यमान आमदार सुरेश गोरे यांचा पराभव केला.
जुन्नर मतदारसंघातही राष्ट्रवादीचाच बोलबाला राहिला. या मतदारसंघात राष्ट्रवादीचे उमेदवार अतुल बेनके यांनी विजय मिळवला, बेनके यांनी या ठिकाणी शिवसेनेच्या उमेदवारास धूळ चारली. मावळात भाजपातून राष्ट्रवादीत आलेले सुनील शेळके यांनी “जायंट किलर’ ठरत भाजपचे राज्यमंत्री बाळा भेगडे यांचा पराभव करीत 25 वर्षाची भाजपची सत्ता उलथून लावली. जिल्ह्यात पुरंदर, खेड, जुन्नर यासह पिंपरी-चिंचवड मधून शिवसेना हद्दपार झाली आहे. तर, भाजपला बारामती, इंदापूर, शिरूर, मावळ या मतदारसंघात अपयश आले आहे.