पुरंदरमध्ये जगताप ठरले राज्यमंत्र्यापेक्षा ‘भारी’

राज्यमंत्री शिवतारे यांचा ३१ हजार ४०४ मतांनी केला पराभव

सासवड – पुरंदर-हवेली विधानसभा मतदारसंघात कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेस आघाडीचे उमेदवार संजय चंदुकाका जगताप यांनी शिवसेनेचे उमेदवार राज्यमंत्री विजय शिवतारे यांचा 31 हजार 404 मतांनी पराभव केला. जगताप यांना 1 लाख 30 हजार 710 तर शिवसेनेचे उमेदवार शिवतारे यांना 99 हजार 306 मते मिळाली. जगताप यांच्या विजयानंतर महाआघाडीच्या कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण करीत मतदान केंद्राबाहेर जल्लोष केला.

दिवे (ता. पुरंदर) येथील आयटीआय संस्थेच्या इमारतीत सकाळी आठ वाजता मतमोजणीस सुरु झाली. सुरवातीला पोस्टल मतदान घेण्यात आले. यामध्ये विजय शिवतारे यांची आघाडी दिसत होती. त्यानंतर हवेली मतदार संघाची मतमोजणी सुरू झाली. हवेलीतूनही शिवतारे यांना आघाडीची मते मिळाली. यामुळे शिवसेनेच्या गोटात उत्साह तर कॉंग्रेस, राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांत अस्वस्थता होती. परंतु, पुरंदर तालुक्‍यातील मतमोजणीच्या फेऱ्या सुरू झाल्यानंतर संजय जगताप यांना आघाडी मिळत गेली. जगताप यांची आघाडी येणाऱ्या प्रत्येक फेरीत वाढत गेली. सासवड शहरातील मतमोजणीतही संजय जगताप यांनी जोरदार मुसंडी मारली. शिवतारे यांच्यावर जगताप यांनी 7288 मतांची आघाडी येथेच घेतली. त्यानंतर शिवतारे पिछाडीवर पडत गेले. अखेरच्या फेरीपर्यंत जगताप यांनी 33 हजार 820 मतांनी दणदणीत विजय मिळवत राज्यमंत्री शिवतारे यांचा पराभव केला.

पुरंदर-हवेली विधानसभा मतदारसंघातून एकूण अकरा उमेदवार निवडणूक रिंगणात होते. यापैकी तब्बल नऊ उमेदवारांची अनामत रक्कम जप्त झाली आहे. कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेस महाआघाडीकडून संजय जगताप यांनी पुरंदर-हवेली विधानसभा मतदारसंघात अभूतपूर्व विजयाची नोंद करीत गेली दोन टर्म आमदार आणि राज्यमंत्री असलेले विजय शिवतारे यांचा पराभव केला आहे. यामुळे संजय जगताप यांच्या विजयाची नोंद राज्यपातळीवरही घेतली गेली आहे.

पुरंदर-हवेलीतून लढणारे महाआघाडीचे उमेदवार संजय जगताप यांना सलग दोन वेळा पराभव स्विकारावा लागला होता. त्यानंतरही खचून न जाता जगताप यांनी तब्बल 10 वर्षे जनतेत मिसळून मतदार संघावर आपले वर्चस्व कायम ठेवले होते. कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस हे दोन्ही पक्ष एकत्र आल्याने तेथेच शिवतारे यांचा पराभव निश्‍चित झाल्याचे सांगितले जात आहे. त्यातच शिवतारे यांनी विजयासाठी मोठे प्रयत्न केले. शिवसेनेचे युवा नेते आदित्य ठाकरे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मोठ्या सभा सासवडमध्ये घेतल्या होत्या.

राष्ट्रवादीची मिळाली साथ…
कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीच्या माध्यमातून तयार झालेल्या एकीतून पुरंदमधून शिवसेनेची सत्ता उलथवून लावण्यात संजय जगताप यांना यश आले. एकीच्या बळातूनच जगताप यांना भरघोस मत मिळवता आली. यामध्ये त्यांना राष्ट्रवादीची मोठी साथ मिळाली असल्याचे सांगितले जात आहे. गेल्या दोन टर्म मध्ये राष्ट्रवादीकडून स्वतंत्र उमेदवार दिला जात होता. याच कारणातून शिवसेनेचे उमेदवार विजय शिवतारे निवडून येत होते. अन्य निवडणुकांमध्येही अशीच स्थिती असल्याने कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीला यश मिळत नव्हते. विधानसभेसाठी मात्र झालेली ही आघाडी शिवतारे यांचा पराभवाकरीता महत्त्वाची ठरली.

 

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.