नगर – जिल्ह्यातील बारा विधानसभा मतदारसंघांची मतमोजणी गुरुवारी,दि.24 होत असून त्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने बाराही विधानसभा मतदारसंघाच्या मतमोजणी परिसरात प्रतिबंधात्मक आदेश जारी केले आहेत. त्यानुसार आज मध्यरात्रीपासून दि.24 रोजीच्या मध्यरात्रीपर्यंत हे आदेश लागू राहणार आहेत. जिल्हादंडाधिकारी राहुल द्विवेदी यांनी हे आदेश जारी केले आहेत.
मतमोजणीच्या दिवशी मतमोजणीचे परिसरात मोठ्या प्रमाणात गर्दी होण्याची शक्यता गृहीत धरुन मतमोजणी शांततामय वातावरणात व सुरळीतपणे पार पाडण्यासाठी आणि कायदा व सुव्यवस्था बाधित राखण्याच्या दृष्टीने फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 च्या कलम 144 अन्वये प्रतिबंधात्मक आदेश जारी करण्यात आले आहेत.
त्यानुसार, कोणत्याही व्यक्तीस मतमोजणी ठिकाणीपासून 200 मीटर अंतराच्या आतील कोणत्याही सार्वजनिक वा खाजगी जागेमध्ये निवडणूकीचे मतमोजणीसाठी नियुक्त सरकारी अधिकारी/ कर्मचारी, उमेदवार व त्यांचा निवडणूक प्रतिनिधी, मतमोजणी प्रतिनिधी तसेच भारत निवडणूक आयोगातर्फे परवानगी देण्यात आलेल्या व्यक्ती यांच्या व्यतिरिक्त इतरांना मतमोजणी केंद्र परिसरात प्रवेशास मज्जाव असेल. निवडणूक मतमोजणी प्रक्रियेच्या कामासंबंधी नगर जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघ निहाय संबंधित निवडणूक निर्णय अधिकारी/सहायक निवडणूक निर्णय अधिकारी यांनी परवानगी दिलेल्या व्यक्ती व्यतिरिक्त कोणासही पेन, मोबाइल फोन किंवा कॅमेरा मतमोजणी ठिकाणच्या 200 मीटरचे आतील परिसरात घेऊन जाता येणार नाही किंवा 200 मीटरच्या आतील परिसरात पी.सी.ओ.चालू ठेवणार नाही.
कोणीही व्यक्ती शस्त्र, क्षेपक, काड्यांची पेटी, लायटर, इतर कोणतीही आक्षेपार्ह वस्तू, वॉकी-टॉकी, कॉडलेस टेलिफोन, ज्वलनशील पदार्थ घेऊन मतमोजणी केंद्रात प्रवेश करणार नाहीत. मतमोजणीचे ठिकाणा पासून 200 मीटरच्या आत कोणत्याही पक्षाचे कार्यालय किंवा उमेदवाराचे कार्यालय उघडे राहणार नाही किंवा राजकीय होर्डींग, बॅनर, नोटीस फलक, झेंडे लावले जाणार नाहीत. परवानगी देण्यात आलेल्या वाहना व्यतिरिक्त मतमोजणी केंद्रापासून 200 मीटर परिसरात कुठलेही वाहन आणता येणार नाही.
निवडणूकीचा निकाल लागल्यानंतर नगर जिल्ह्याच्या महसुल स्थळसीमेच्या हद्दीत संबंधित पोलीस अधिकारी यांची परवानगी घेतल्याशिवाय कोणासही मिरवणूक काढता येणार नाही. तसेच, कोणीही निवडणुकीत पराभूत उमेदवाराच्या घराजवळ वा इतरत्र जमा होणार नाहीत व प्रक्षोभक घोषणा देणार नाही, असे आदेशात म्हटले आहे. हे आदेश आज मध्यरात्रीपासून ते मतमोजणी प्रक्रिया संपेपर्यंत अथवा उद्या लागू राहतील, असे स्पष्ट करण्यात आले आहे.
मतमोजणीची ठिकाणे
अकोले मतदारसंघाची मतमोजणी कोल्हार-घोटी रोडवरील पॉलीटेक्निक कॉलेज, अकोले. संगमनेर मतदारसंघाची मतमोजणी सहकारमहर्षी भाऊसाहेब संतुजी थोरात स्पोर्टस कॉम्प्लेक्स,संगमनेर. शिर्डी मतदारसंघाची मतमोजणी राहाता येथील मध्यवर्ती प्रशासकीय इमारत, कोपरगाव येथील मतमोजणी सेवा निकेतन कॉन्व्हेंट स्कूल, कोपरगाव. श्रीरामपूर मतदारसंघाची मतमोजणी मध्यवर्ती प्रशासकीय इमारत, तहसील कार्यालय, श्रीरामपूर. नेवासा मतदारसंघाची मतमोजणी नवीन शासकीय गोडावून सेंट मेरी स्कूल जवळ, मुकींदपूर येथे होणार आहे. शेवगाव मतदारसंघाची मतमोजणी तहसील कार्यालय शेवगाव.
राहुरी मतदारसंघाची मतमोजणी लोकनेते रामदास पाटील धुमाळ आर्टस, सायन्स आणि कॉमर्स कॉलेज, राहुरी. पारनेर मतदारसंघाची मतमोजणी न्यू आर्टस कॉमर्स आणि सायन्स कॉलेज पारनेर. अहमदनगर शहर मतदारसंघाची मतमोजणी महाराष्ट्र राज्य वखार महामंडळ गोदाम क्र. 4, एमआयडीसी नागापूर येथे होणार आहे.श्रीगोंदा मतदारसंघाची मतमोजणी ही पेडगाव रोडवरील शासकीय गोदाम, श्रीगोंदा येथे तर कर्जत-जामखेड मतदारसंघाची मतमोजणी नवीन तहसील कार्यालय, कर्जत येथील शासकीय गोडावून येथे होणार आहे.