पिंपळे गुरव – अवघ्या काही दिवसावर आलेल्या दिवाळीचे वेध पिंपळे गुरव मधील नागरिकांना लागले आहेत. वर्षातील सर्वांत मोठ्या सणानिमित्त बाजारपेठेत आकर्षक कपड्यांसह आकाश कंदील, पणत्या, फराळाचे साहित्य अशा विविध वस्तूंची आवक वाढली असून खरेदीसाठी गर्दी होत आहे.
गेल्या काही दिवसांपासून सतत पाऊस सुरु आहे. पावसाने थोडीफार उघडीप दिल्यामुळे दुपारपासूनच दिवाळीच्या खरेदीसाठी उपनगरांच्या बाजारपेठेत ग्राहकानी गर्दी केली. सायंकाळी बाजारपेठेत गर्दी वाढल्याने ठिकठिकाणी वाहतुकीची कोंडी झाली होती. पिंपळे गुरवमधील रामकृष्ण चौक ते दापोडीकडे जाणारा रस्ता हा गर्दीने फुलत आहे. तसेच पिंपळे गुरव येथील मोरया पार्क येथेही ग्राहकांची मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती.यंदा सर्वत्र समाधानकारक पाऊस झाला आहे. त्यातच दिवाळीच्या पार्श्वभूमीवर सोन्या चांदीचे दागिने, भेट वस्तू, आदी विविध प्रकारच्या वस्तू खरेदीसाठी ग्राहकांची लगबग सुरु असलेली दिसून येत आहे.
सुरुवात फराळाच्या साहित्यापासून
दिवाळीचा सण मोठा, नाही आनंदाला तोटा… असे म्हणतात. म्हणूनच हा सण जल्लोषात साजरा करण्यासाठी वर्षभर प्लॅनिंग केले जाते. अवघ्या दोनचार दिवसांवर आलेल्या दिवाळीमुळे खरेदी करण्यासाठी महिलावर्ग घराबाहेर पडत आहेत. फराळ हा दिवाळीचा अविभाज्य घटक आहे. हे पदार्थ बनविण्यासाठी महिलांचा आठवडा जातो. त्यामुळे दिवाळी खरेदीची सुरुवात धान्य व फराळाच्या साहित्याने केली जाते. हरभरा डाळ, तांदूळ, दाळे, मैदा, साखर, ड्रायफ्रुट, तेल, चिवड्यासाठी विविध प्रकारचे चिरमुरे या साहित्याची खरेदी केली जात आहे. पणत्या, रांगोळ्या, भेटवस्तू, छोटेखानी स्टॉलबरोबरच कपड्यांच्या दुकानांतर्ही गर्दी बघायला मिळाली. आनंदोत्सवाच्या मालिकेतील सर्वात मोठा असा दिवाळी सण आता अवघ्या चार दिवसांवर आला असल्याची चाहूल प्रकर्षाने बाजारपेठेत जाणवत आहे.
उत्सव प्रकाशाचा
पूर्वी केवळ मातीपासून बनविलेल्या पणत्या दारात लावल्या जायच्या. आता त्याला सुरेख रंग, लेस, कुंदनसह आकर्षक डिझाईन केली जाते. ग्राहकांची आवड व ऑर्डरनुसार पणत्या बनवून दिल्या जातात. याशिवाय लक्ष्मीपूजनाच्या समोर, रांगोळीवर ठेवण्यासाठी मोठ्या आकाराचे दिवे लावले जातात. त्यामुळे बाजारात ठिकठिकाणी मांडलेल्या पणत्या लक्ष वेधून घेत आहेत. मोठ्यांसह लहान मुलांसाठीही नावीन्यपूर्ण फॅशनचे कपडे बाजारात आले आहेत. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर बाजारपेठेत किड्स, जेन्टस, लेडीज व्हरायटी दाखल झाल्या आहेत. खरेदीसाठी दुपारनंतर ग्राहकांची गर्दी होत आहे. ग्राहक कपडे खरेदीसाठी अगोदरच गर्दी करतात. किड्स, जेन्टस, लेडीजच्या नवनवीन बाजारात व्हरायटी आल्या आहेत. त्यात कार्बो, जॉगर या पॅन्टला अधिक पसंती मिळत आहे. तर मुलींसाठी हेवी चुडीदार या नवीन पॅटर्न आला असून त्याला पसंती मिळत असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले.
खरेदीची मोठी यादी
भिशी, बोनस या माध्यमांतून येणारा पैसा सणासाठी आणि आनंदासाठी खर्च केला जातो. सध्या निवडणुकीची चर्चा सर्वत्र होत असली, तरी सर्वसामान्य नागरिकांकडून दिवाळीच्या तयारीला सुरुवात झाली आहे. बाजारात उटणे, विविध आकाराचे रंगाचे आकाश कंदील, पणत्या, फराळाचे तयार पदार्थ विक्रीसाठी ठेवण्यात आले आहेत. दिवाळीसाठी लागणाऱ्या साहित्याची यादी प्रत्येक घरात तयार झाली असून प्रत्येकजण आपल्या क्षमतेनुसार ही लांबलचक यादी पूर्ण करण्याचा प्रयत्न करतो. दिवाळी निमित्ताने बनविण्यात येणाऱ्या किल्ल्यावर ठेवण्यासाठी शिवाजी महाराज आणि त्यांचे मावळे यांचे पुतळे खरेदी करण्यास बच्चे कंपनीने सुरूवात केली आहे. तर यंदा काहींनी थेट तयार किल्ले विकत घेण्यास पसंती दिली आहे.
निगडीत खरेदीसाठी गर्दी
निगडी परिसरात दिवाळी सणासाठी बाजारात विविध आकाराच्या, कलाकसुरीयुक्त, मातीच्या छोट्या, मोठ्या पणत्या, विविध रंगांचे आकाश कंदील, पूजेसाठी केरसुणी, मावळ्यांच्या, शिवाजी महारांजांच्या मुर्त्या, किल्ले,तोफा, दीप माळा, सुगंधी उटणे, तेल, घरासमोर मांगल्याचे प्रतिक म्हणून काढण्यात येणाऱ्या रांगोळीसाठी विविध रंगाची रांगोळी, रस्त्यावर, दुकानात ठेवली आहेत.
नवीन खरेदीसाठी मोबाइल, कापड दुकांने, फटाके स्टॉल, दागिने खरेदीसाठी सोनारांची दुकाने फुलू लागली आहेत. धनत्रयोदशी, नरकचतुर्थी, पाडवा, भाऊबीज दिवशी लागणारे साहित्याने दुकाने बाजारपेठ माणसांच्या गर्दीने फुलत आहे. शालेय मुलांना सुट्या असल्याने पालकाबरोबर लहान मुलेही खरेदीसाठी पालकासोबत आनंद घेत आहेत. दीपावलीसणात विविध प्रकारच्या दिपमाला इलेट्रिक दुकाने, सोन्या चांदींची, कापडांची, दुकाने सज्ज झाली आहेत.
दिवाळी सण अवघ्या दोन दिवसांवर येऊन ठेपली आहे. आहे. त्यामुळे बाजारपेठेत ग्राहकांची खरेदीसाठी गर्दी होत आहे. तसेच निगडी, आकुडी, रुपीनगर, यमुनानगर या परिसरातील बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात गर्दी दिसून आली. परंतु, पाऊस असून देखील ग्राहकांची खरेदीसाठी लगबग दिसून आली.