मत मिळविण्यासाठी नेते-कार्यकर्त्यांची धडपड : जिल्ह्यात 26 हजार टपाली मतदान
नगर – जिल्ह्याच्या बाराही विधानसभा मतदारसंघात प्रचाराचा रंग भरला आहे. हा रंग भरत असतानाच एक-एक मत आपल्याकडे वळविण्याचा प्रयत्न सदर उमेदवार व कार्येकर्ते करत आहेत. यातूनच जिल्ह्यातील कर्मचाऱ्यांचे 26664 टपाली मतदान आपल्याला कसे मिळेल यावर सर्वांचा डोळा आहे. त्यातून कर्मचाऱ्यांवर मतपत्रिका ताब्यात देण्यावरून वादंग होवू लागले आहेत.
जिल्ह्यातील बारा मतदारसंघात निवडणूक प्रक्रियेसाठी एकूण 26484 अधिकारी व कर्मचारी नियुक्त करण्यात आलेले आहेत. यात बारा मतदारसंघात एक केंद्राध्यक्ष,तीन मतदान अधिकारी,एक शिपाई,पोलिस असे 22342 अतिरिक्त 10 टक्के मिळून 24584 व मतदान केंद्राच्या परिसरात नियुक्त 1900 असे एकूण 26384 कर्मचारी नियुक्त केलेले आहेत.
या कर्मचाऱ्यांना निवडणूक आयोगाने टपाली मतांची व्यवस्था केलेली आहे. हे मतदान करून ते टपालाने वा प्रत्यक्ष स्वतः पोहच करता येवू शकते. सध्या या कर्मचाऱ्यांना ज्या ठिकाणी प्रशिक्षण दिले जाते त्यादिवशी तिथेही मतदान करता येवू शकते.तेथे मतदान पेट्यांची व्यवस्था आहे. तर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या निवडणूक शाखेतही मतदान पेट्यांची सुविधा उपलब्ध आहे.
असे असले तरी संबंधित मतदारसंघातील उमेदवार व त्यांचे कार्यकर्ते या कर्मचाऱ्यांवर दबाव आणत बॅलेट पेपर आपल्या ताब्यात घेवून ते निवडणूक अधिकाऱ्यांकडे जमा करत असल्याच्या अनेक तक्रारी कर्मचाऱ्यांनी केल्या आहेत.मात्र भीतीपोटी तक्रार करण्यास कुणी पुढे धजावत नाही.निवडणूक शाखेचे या विषयाकडे लक्ष वेधले असता कर्मचाऱ्यांनी कुणालाही न घाबरता मतदान करावे. उमेदवारांना याबाबत कोणत्याही सूचना करता येत नाहीत. ज्यावेळी लेखी तक्रार येईल त्यावेळी पोलिस प्रशासन यावर निर्णय घेईल.
सैनिकांचे मतदान ऑनलाइन
कर्मचाऱ्यांचे जसे पोस्टल मतदान आहे तसेच लष्करात कार्यरत सैनिकांचे ऑनलाइन मतदान आहे. ते एकूण 10,258 असून मतमोजणीच्या दिवशी सकाळपर्यंत ते स्वीकारले जाणार आहे. हे मतदान ऑनलाइन असल्याने त्यात संबंधित उमेदवार व कार्यकर्त्यांना लुडबूड करण्याची संधी नसली तरी आमच्याच उमेदवाराला मतदान करा अशी विनवणी सैनिकांना केली जात आहे.
मतदारसंघनिहाय पोस्टल मतदान
अकोले-1842,संगमनेर-1668,शिर्डी-1620,कोपरगाव-1614,श्रीरामपूर-1860,नेवासा-1614,श्रीरामपूर-1860,नेवासा-1614,शेवगाव-2166,राहुरी-1842,पारनेर-2190,नगर शहर-1734,श्रीगोंदा-2064,कर्जत-जामखेड-2118