वाचन प्रेरणा दिन : ज्ञानाचे सगळे भांडार साहित्यात

आज वाचन प्रेरणा दिन आहे. व्यक्‍तिमत्त्व विकासात वाचनाला खूप महत्त्व आहे. हातात पुस्तक असेल तर सुविचार, सुसंस्कृतपणा आणि सुविधा आपली हस्तके होतात. आज समाज माध्यमांच्या वाढत्या वापराने आपल्याला पुस्तके वाचण्यासाठी वेळ मिळत नाही. तासन्‌ तास युवा पिढी “ऑनलाइन’ असते. युवा पिढीने रोज वाचनासाठी वेळ काढलाच पाहिजे. दिवसभरात काहीतरी वाचलेच पाहिजे, त्याने वैचारिक प्रगल्भता वाढते. विचारांची बैठक तयार होते. आपल्या व्यक्तिमत्त्वाला नवा आयाम मिळतो, या गोष्टी लक्षात घेऊन या संस्काराचा वारसा जपण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे.

वाचनाने मनाची आणि मेंदूचीही मशागत होते, असे म्हटले जाते. आज माहिती तंत्रज्ञानाच्या युगात वाचनाकडे दुर्लक्ष होत आहे. पुस्तके वाचल्याने ज्ञानाच्या कक्षा रुंदावतात आणि आपल्या ज्ञानात भर पडते आणि त्यामुळेच आपण “वाचाल तर वाचाल ‘असे आपण नेहमी म्हणतो.

मराठी साहित्यात वाचनासाठी आत्मचरित्र, कथा, कादंबरी, नाटक, मासिके, साप्ताहिके, वर्तमानपत्र आदी स्वरूपात साहित्य उपलब्ध आहे, त्यामुळे आपल्या आवडीनुसार आपण वाचन केले पाहिजे. ज्ञानाचे सगळे भांडार आपल्या या साहित्यात आहे. अनेक मोठी माणसे वाचनातूनच घडली. वाचनातून मनावर झालेल्या संस्कारांनी त्यांच्या आयुष्यला आकार मिळाला. आपल्याकडे एखाद्या कार्यक्रमाला जाताना पुष्पगुच्छ देण्याची पद्धत आहे, त्याऐवजी पुस्तके भेट देण्याची प्रथा समाजात रूढ झाली पाहिजे आणि मिळालेली पुस्तके वाचली गेली पाहिजेत. लहा मुलांना वाढदिवसाच्या निमित्ताने पुस्तके दिली तर लहानपणापासूनच त्यांच्यावर नकळतपणे वाचनसंस्कार रूजविला जाईल. आपले आई-वडील किंवा घरातील व्यक्ती पुस्तके वाचतात. हे पाहून मुलेसुद्धा वाचनाची गोडी लागण्यास मदत होईल, यामुळे आपोआप वाचन चळवळ वाढण्यास मदत होईल.

आजच्या धावपळीच्या जगात शांत आणि समाधानी राहण्यासाठी आपण आपल्या आवडीप्रमाणे रोज वाचन केले पाहिजे. जीवनात मनाची मशागत करायला वाचनाशिवाय दुसरा चांगला उपाय नाही. पुस्तक साहित्याचे असो वा इतिहासाचे, भूगोलाचे असो वा विज्ञानाचे, कथा असो कादंबरी आपल्या ज्ञानात भर घालते. वाचनाने मन प्रसन्न होते. मनाला आनंद मिळतो. त्याबरोबर आत्मिक समाधान मिळते. घरात पुस्तकांचे कपाट असायलाच पाहिजे, त्या कपाटात मुलांच्या वयोगटानुसार पुस्तके असावीत. लहान मुलांच्या मनावर संस्कार करण्यासाठी छोट्या छोट्या बोधपर गोष्टी खूप चांगला परिणाम करतात. त्याने शब्दसंपत्तीत आणि संस्कारात वाढ होते.

मुलांचे कथाकथन, वक्तृत्व संभाषण कौशल्य विकसित होते. मुलांच्या जडणघडणीत वाचनाचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. आज वाचन प्रेरणा दिन आहे, त्यामुळे वाचनसंस्कृती टिकवण्यासाठी आपण सर्वांनीच प्रयत्न करण्याची या निमित्ताने प्रतिज्ञा करू या.

Leave A Reply

Your email address will not be published.