मुंबई – मुंबईतील शिवाजी पार्कमध्ये शिवसेनेचा दसरा मेळावा साजरा झाला. यावेळी उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये या मेळाव्याला राज्याच्या कानाकोपऱ्यातून शिवसैनिक सहभागी झाले होते. या कार्यक्रमात शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी शिवसेनेच्या पुढील काळातील आपली भूमिका स्पष्ट केली.
पुढील वर्षी दसरा मेळाव्याला पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या शेजारी शिवसेनेचा मुख्यमंत्री बसलेला असेल असा दावा त्यांनी केला आहे. त्याचप्रमाणे उद्धव ठाकरे यांनी आपल्या भाषणात पक्षाच्या अनेक ठळक मुद्यांविषयी भूमिका मांडत ‘सत्ता तर मला पाहिजेच, कोणत्याही परिस्थितीत पाहिजे.” असेही ते म्हणाले होते. त्यांच्या यामुळे विधानांमुळे आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.
तत्पूर्वी, विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेना-भाजप व मित्रपक्षांच्या महायुतीची अधिकृत घोषणा केली होती. यावेळी शिवसेना १२४, भाजप १५० आणि मित्रपक्ष २ जागांवर लढणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले होते. या घोषणेनंतर भाजप आणि शिवसेनेसह सर्वच राजकीय पक्षाच्या नेत्यांकडून आगामी मुख्यमंत्री हा आमच्याच पक्षाचा होणार असं सांगण्यात येत आहे. मुख्यमंत्रिपदावरुन सर्वच पक्षांमध्ये कलगीतुरा रंगत आहे.