कलाटे, ओव्हाळ, बनसोडे, अमित गोरखे यांचे बंड
पिंपरी – उमेदवारी अर्ज भरण्यास अवघा एक दिवस शिल्लक राहिलेला असतानाच शहरातील राजकीय घडामोडी वेगवान झाल्या असून आज दिवसभरात महायुतीमध्ये बिघाडी झाली तर राष्ट्रवादीने आपला एकमेव उमेदवार जाहीर केल्यानंतर पक्षाला बंडखोरीची लागण झाली आहे.
राष्ट्रवादीचे माजी आमदार अण्णा बनसोडे यांनी अपक्ष लढविणार असल्याचे जाहीर केले असून त्यांच्या पाठोपाठ शेखर ओव्हाळ यांनीही पत्रकार परिषद घेऊन आता माघार घेणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. तर पिंपरी विधानसभा मतदारसंघातून भाजपाचे अमित गोरखे यांनी उमेदवारी अर्ज दाखल करत विधानसभेच्या मैदानात उडी घेतली असून चिंचवड विधानसभा मतदारसंघातून शिवसेनेचे गटनेते राहुल कलाटे हे आपला उमेदवारी अर्ज उद्या (शुक्रवारी) दाखल करणार आहेत. एकूणच दिवसभर शहरातील राजकीय वातावरण ढवळून निघाले होते.
महाराष्ट्र विधानसभेची सार्वत्रिक निवडणूक जाहीर झाल्यापासून युती आणि आघाडीवर होणाऱ्या चर्चेनंतर उमेदवार कोण यावर चर्चा रंगल्या होत्या. महायुतीने उमेदवारी घोषित करत बाजी मारल्यानंतर आज पिंपरी विधानसभा मतदारसंघातून नगरसेविका सुलक्षणा शिलवंत-धर यांना राष्ट्रवादीने आपली अधिकृत उमेदवारी घोषित केली. तर चिंचवड विधानसभेतून राष्ट्रवादीने अधिकृतरित्या प्रशांत शितोळे यांना उमेदवारी घोषित केली नसली तरी अधिकृत उमेदवारी अर्ज दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. प्रशांत शितोळे यांची आज वेळ चुकल्याने ते उद्या राष्ट्रवादीकडून अधिकृत उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. सुलक्षणा शिलवंत आणि प्रशांत शितोळे यांच्या उमेदवारीनंतर राष्ट्रवादीत एकच खळबळ उडाली असून पक्षातील इच्छुकांनी बंडखोरी करत निवडणूक लढविण्याचे आले इरादे स्पष्ट केले आहेत.
राष्ट्रवादीत बंडखोरांनी डोके वर काढलेले असतानाच महायुतीलाही बिघाडीचे ग्रहण लागले आहे. अण्णाभाऊ साठे महामंडळाचे अध्यक्ष अमित गोरखे यांनी पिंपरी विधानसभेतून अपक्ष म्हणून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. विशेष म्हणजे गोरखे यांचा उमेदवारी अर्ज दाखल करताना भाजपाचे नगरसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते. वरिष्ठांच्या आदेशानंतरच आपण अर्ज दाखल केला असून आपण पिंपरी विधानसभा लढविणारच असा दावाही गोरखे यांनी केला आहे. पिंपरी विधानसभेची जागा युतीमध्ये शिवसेनेकडे आहे. असे असतानाही गोरखे यांनी घेतलेल्या पवित्र्यामुळे युतीमधील बिघाडी समोर आली आहे.
शिवसेना गटनेते राहुल कलाटे हे चिंचवड विधानसभेतून इच्छुक होते. मात्र जागावाटपात हा मतदारसंघ भाजपाकडे गेल्यामुळे राहुल कलाटे हे अपक्ष म्हणून विधानसभेच्या मैदानात उतरणार असून ते उद्या शुक्रवारी आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. यावेळी ते जोरदार शक्तीप्रदर्शन करणार असल्याचे त्यांच्या
समर्थकांनी सांगितले.