भालाफेकीत अनुला आठवे स्थान, स्टीपलचेसमध्ये अविनाश अंतिम फेरीत
दोहा: भारताच्या अनु राणीला जागतिक मैदानी स्पर्धेतील महिलांच्या भालाफेकीत आठव्या क्रमांकावर समाधान मानावे लागले. तिचा सहकारी अविनाश साबळे याने 3 हजार मीटर्स स्टीपलचेसमध्ये अंतिम फेरीत स्थान मिळवित अपेक्षा उंचावणारी कामगिरी केली.
अनुने भालाफेकीच्या प्राथमिक फेरीत 62.43 मीटर्स हा तिचा राष्ट्रीय विक्रम प्रस्थापित केला होता. मात्र अंतिम फेरीत तिला या कामगिरीइतकीही कामगिरी करता आली नाही. 27 वर्षीय खेळाडू अनुने अंतिम फेरीतील तीन प्रयत्नात अनुक्रमे 59.25 मी, 61.12 मी. व 60.40 मी अशी कामगिरी केली. पुन्हा तिला तीन वेळा थ्रो करण्याची संधी मिळाली. त्यावेळी तिने अनुक्रमे 60.40 मी., 58.49 मी. व 57.93 मी अशी कामगिरी नोंदविली. या क्रीडाप्रकारात गतवर्षीची राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा विजेती खेळाडू कॅस्ली लीबार्बरने सुवर्णपदकाची कमाई केली. तिने 66.56 मीटर्सपर्यंत भालाफेक करीत सोनेरी कामगिरी केली. चीनच्या लिऊ शियिंग (65.88 मी.) व लिऊ हुईहुई (65.49 मीटर्स) यांनी अनुक्रमे रौप्यपदक व ब्रॉंझपदक मिळविले.
स्टीपलचेसमध्ये अविनाश याने 8 मिनिटे 25.23 सेकंद वेळ नोंदवित स्वत:च नोंदविलेला 8 मिनिटे 28.94 सेकंद हा राष्ट्रीय विक्रम मोडला. त्याने येथील तिसऱ्या प्राथमिक फेरीत सातवे स्थान मिळविले. या शर्यतीत सहभागी झालेल्या 44 खेळाडूंमध्ये त्याला 20 वे स्थान मिळाले होते. मात्र तो धावत असताना दोन वेळा अन्य खेळाडूंचा त्याला अडथळा झाल्याची तक्रार भारतीय ऍथलेटिक्स महासंघाकडून करण्यात आली. त्यानुसार तांत्रिक समितीने या शर्यतीचा व्हिडिओ पाहून भारताच्या तक्रारीत तथ्य असल्याचे मान्य केले. प्राथमिक फेरीतील त्याच्या स्थानात बदल झाला नाही मात्र, 16 वा खेळाडू म्हणून अविनाशला अंतिम फेरीत स्थान दिले. दोन्ही वेळा जागतिक कनिष्ठ विजेता टेकेले निगाटे हाच अविनाशच्या मार्गात आला होता. अडथळा ओलांडताना त्याने अविनाशच्या पुढेच उडी घेतली होती. साहजिकच त्याच्याशी टक्कर होऊ नये म्हणून अविनाशला थोडासा वेग कमी करावा लागला होता.
शेतकऱ्याचे पोर लई हुशार !
अविनाश हा महाराष्ट्रातील मांडवा (बीड) या खेडेगावातील खेळाडू आहे. शेतकरी कुटुंबात जन्म झालेला अविनाश याला वयाच्या 6 व्या वर्षापासूनच धावण्याची आवड निर्माण झाली. त्याच्या गावात कोणतीही वाहन व्यवस्था नसल्यामुळे घरापासून त्याची शाळा 6 किलोमीटर अंतरावर असल्यामुळे तो शाळेत धावतच जात असे. बारावीपर्यंतचे शिक्षण झाल्यानंतर तो सेनादलात दाखल झाला. त्याची पहिलीच नियुक्ती सियाचीन ग्लेसियर येथे करण्यात आली होती. गतवर्षी त्याने राष्ट्रीय खुल्या स्पर्धेत विक्रम नोंदविला. मात्र घोट्याच्या दुखापतीमुळे त्याला आशियाई क्रीडा स्पर्धेत सहभागी होता आले नव्हते. यंदा फेडरेशन चषक स्पर्धेद्वारे त्याने आशियाई अजिंक्यपद व जागतिक स्पर्धेची पात्रता पूर्ण केली होती. स्टीपलचेसमधील पुरूष गटात जागतिक स्पर्धेची पात्रता करण्याचा मान भारताच्या दीनारामने 1991 मध्ये मिळविला होता.